

अग्निशमन दल जवानांसाठी १६ कोटींचे ‘सुरक्षाकवच’
२,१७६ पीपीई किट खरेदीचा मार्ग मोकळा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : मुंबईत आगीच्या दुर्घटना, इमारती कोसळणे किंवा इतर आपत्कालीन बचावकार्यात स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. जवानांच्या सुरक्षेसाठी पालिकेकडून लवकरच अत्याधुनिक स्वसंरक्षण उपकरण संच (पीपीई किट) खरेदी करण्यात येणार आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय आणि भारतीय मानकांनुसार तयार करण्यात येणारे कोट, ट्राउझर, हुड आणि ग्लोव्हज अशा २,१७६ संचांचा समावेश आहे. या खरेदीसाठी सुमारे १५ कोटी ९९ लाख ९६ हजार २४९ रुपयांचे कंत्राट देण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने मंजुरीसाठी सादर केला आहे.
आग विझवताना निर्माण होणाऱ्या प्रचंड उष्णतेपासून जवानांचे रक्षण व्हावे, यासाठी हे विशेष गणवेश अत्यंत आवश्यक असतात. नियमानुसार दर दोन वर्षांनी हे संच बदलणे आवश्यक असल्याने चालू वर्षात ही नवीन खरेदी केली जात आहे. पालिकेने या कामासाठी १८ कोटी ११ लाख ६० हजार ७०४ रुपयांचा अंदाज तयार केला होता. या कामासाठी मागवण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेत चार कंपन्यांनी सहभाग घेतला होता. कागदपत्रांची पूर्तता न केल्याने एका कंपनीची निविदा बाद ठरली, तर उर्वरित तीन कंपन्यांमधून मेसर्स अमी एंटरप्राइज यांनी कार्यालयीन अंदाजापेक्षा १५.०८ टक्के कमी दर सादर केले. त्यामुळे सर्वात कमी दर सादर करणाऱ्या या कंपनीला हे कंत्राट देण्याची शिफारस करण्यात आली आहे.
कडक तपासणी निकष
या गणवेशाचा दर्जा आणि सुरक्षितता जपण्यासाठी पालिकेने कडक तपासणी निकष ठेवले आहेत. साहित्याचा पुरवठा करण्यापूर्वी मान्यताप्राप्त तृतीय पक्ष (थर्ड पार्टी) तपासणी संस्थेकडून आणि त्यानंतर प्रयोगशाळेत या साहित्याची गुणवत्ता तपासली जाईल. पुरवठा आदेश जारी झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत ही सर्व सामग्री अग्निशमन दलाला उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. या नव्या दर्जेदार गणवेशांमुळे आगीच्या भक्ष्यस्थानी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या जवानांना मोठी सुरक्षा मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.