

एक्स-रे मशीनची खरेदी रखडली
आमदार रईस शेख यांची चौकशीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : महापालिकेच्या कूपर आणि सायन रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या तपासणीसाठी आवश्यक असलेल्या एक्स-रे मशीनची खरेदी प्रक्रिया गेल्या दोन वर्षांपासून रखडल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केला आहे. आवश्यक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांच्या तपासणी आणि उपचारांमध्ये विलंब होत असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असून, त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
शेख यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहून या मशीनच्या खरेदी प्रक्रियेत झालेल्या कथित विलंबाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच केंद्रीय खरेदी विभागाची जबाबदारी सांभाळणारे अतिरिक्त महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांच्या भूमिकेचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. शेख यांच्या म्हणण्यानुसार, कूपर आणि सायन रुग्णालयांसाठी दोन एक्स-रे मशीनची अंदाजित किंमत सुमारे ३ कोटी रुपये होती. निविदा प्रक्रियेत जपानमधील कोनिका मिनोल्टा कंपनीने सहभाग घेतला होता. तत्कालीन अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या मंजुरीनंतर उघडण्यात आलेली कंपनीची आर्थिक बोली अंदाजित किमतीपेक्षा १९ टक्क्यांनी कमी होती. शेख यांच्या म्हणण्यानुसार संबंधित फाईल डीएल प्रक्रियेसाठी पाठवण्यात आल्यानंतर अतिरिक्त महापालिका आयुक्तांनी निविदा रद्द करण्याचे निर्देश दिले. निविदा रद्द करण्यामागे कोणतेही ठोस कारण नव्हते. त्यामुळे रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या दोन एक्स-रे मशीनची खरेदी प्रक्रिया विनाकारण लांबली.
दुहेरी निकषाचा आरोप
निविदा प्रक्रियेत कथित दुहेरी निकष वापरण्यात आल्याचा आरोप करीत आमदार रईस शेख यांनी या प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, याच कालावधीत अॅनेस्थेशिया वर्कस्टेशनच्या खरेदीसाठी चिनी कंपनी माइंड्रेची एकमेव बोली मंजूर करण्यात आली. त्याच काळात एक्स-रे मशीनची निविदा रद्द करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.