देवनार कत्तलखान्याचा कायापालट निविदांच्या कचाट्यात

देवनार कत्तलखान्याचा कायापालट निविदांच्या कचाट्यात
Published on

देवनार कत्तलखान्याचा कायापालट निविदांच्या कचाट्यात
प्रदूषण रोखण्यासाठी आधुनिक यंत्रणा सज्ज; ९८० कोटींच्या पुनर्विकासाला कंत्राटदारांचा प्रतिसाद नाही
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. ३१ : मुंबईतील एकमेव आणि सर्वात मोठ्या देवनार कत्तलखान्यातील वाढते प्रदूषण आणि दुर्गंधीवर मात करण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे. दररोज प्राण्यांच्या कत्तलीमुळे वाहणाऱ्या तब्बल २०,००० लिटर रक्ताची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका आता अत्याधुनिक ब्लड ड्रॉइंग सिस्टीम आणि पीएनजी भट्टी उभारणार आहे. दरम्यान, यासाठी काढलेल्या निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याने कत्तलखान्याचा कायापालट रखडला आहे.
​देवनार कत्तलखान्यात दररोज सरासरी १,००० शेळ्या-मेंढ्या, २२५ म्हशी आणि ५० ते १०० डुकरांची कत्तल केली जाते. यातून दररोज सुमारे २० हजार लिटर रक्त जमा होते. पूर्वी या रक्तातील सीरम काढून उरलेले रक्त बायोरेमिडिएशन प्लांट किंवा नाल्यांमध्ये जात असल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी व जलप्रदूषण होत होते.
​यावर उपाय म्हणून महापालिकेने रक्त सुकवण्याची यंत्रणा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ​या तंत्रज्ञानाद्वारे रक्तातील पाण्याचा अंश सुकवून त्याची पावडर तयार केली जाईल.​ या पावडरचा वापर सेंद्रिय खत आणि पशुखाद्य बनवण्यासाठी केला जाईल.​ यामुळे पूर्व उपनगरांतील वायू आणि जलप्रदूषण पूर्णपणे रोखण्यास मदत होईल.
​ कत्तलखान्यातील टाकाऊ घटकांची विल्हेवाट लावण्यासाठी पूर्वी मोठ्या प्रमाणावर लाकडांचा वापर केला जात होता. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर आणि वायूप्रदूषण होत असे. आता लाकडाच्या वापरावर पूर्ण बंदी घालण्यात आली असून, त्याऐवजी पीएनजीवर चालणारी अत्याधुनिक भस्मीकरण यंत्रणा बसवली जात आहे. यामुळे शून्य धूर निर्माण होऊन पर्यावरणाचा ऱ्हास टळेल आणि ऊर्जेचीही बचत होईल.

​एकीकडे आधुनिक तंत्रज्ञान वापरले जात असले तरी देवनार कत्तलखान्याच्या मूळ इमारतीचा आणि परिसराचा पुनर्विकास मात्र लाल फितीत अडकला आहे.​ २००८ मध्ये पहिल्यांदा पुनर्विकासाचा आराखडा तयार करून निविदा काढण्यात आली, पण प्रतिसाद मिळाला नाही. ​२०१९ मध्ये दुसऱ्यांदा निविदा काढण्यात आली. ​२०२२ मध्ये टर्नकी तत्त्वावर ९८० कोटींचा भव्य पुनर्विकास प्रकल्प जाहीर करण्यात आला. तसेच ​नोव्हेंबर २०२५ पर्यंत तब्बल सात वेळा मुदतवाढ देऊनही एकाही कंत्राटदार कंपनीने यात स्वारस्य दाखवलेले नाही.

प्रशासनाच्या चिंतेत भर
देवनार कत्तलखाना अत्यंत जुना झाला असून, त्याच्या आधुनिकीकरणाची तातडीची गरज आहे. प्राण्यांना ठेवण्याची जागा आणि कत्तलखाना दोन्ही हायटेक करणे आवश्यक आहे. दरम्यान, वारंवार टेंडर काढूनही कोणतीही कंपनी पुढे येत नसल्याने आमची चिंता वाढली आहे, अशी प्रतिक्रिया देवनार पशुवधगृहाचे व्यवस्‍थापक डॉ. कलीमपाशा पठाण यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com