

दादर ते डहाणू रोडपर्यंत
आजपासून थेट सेवा
पश्चिम रेल्वेवर नवे वेळापत्रक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय सेवेसाठी मंगळवारपासून (ता. १) नवे वेळापत्रक लागू होणार आहे. प्रवाशांची मागणी आणि सेवांची गरज लक्षात घेऊन दादर ते डहाणू रोडपर्यंत थेट लोकल सेवा सुरू होणार आहे. एकूण १,४१४ फेऱ्या कायम ठेवून सहा नव्या धीम्या लोकल सुरू करण्यात येणार आहेत. त्याच वेळी कमी मागणीच्या सहा फेऱ्या रद्द करण्यात आल्या, तर वातानुकूलित लोकलच्या दोन फेऱ्यांचीही भर पडणार आहे.
दादर ते डहाणू रोड थेट लोकल सेवेसाठी दादर-विरार आणि विरार-डहाणू रोड या सेवांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे दादरहून सायंकाळी ५.२२ वाजता सुटणारी लोकल रात्री ७.३० वाजता डहाणू रोडला पोहोचेल. विरार येथे लोकल बदलण्याची गरज नसल्याने डहाणू रोडच्या प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे. दुसरीकडे विरारहून सकाळी ८.२३ वाजता सुटणारी दादर लोकल आता चर्चगेटपर्यंत धावणार असून, सकाळी ९.४८ वाजता चर्चगेटला पोहोचेल. त्याचप्रमाणे चर्चगेटहून सकाळी ९.५२ वाजता सुटणारी लोकल नालासोपाऱ्यापर्यंत वाढविण्यात आली आहे.
एसी सेवांमध्येही बदल
वातानुकूलित लोकलच्या दोन नवीन फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. चर्चगेट-बोरिवली सेवा सायंकाळी ५.२८ वाजता, तर बोरिवली-चर्चगेट सेवा सायंकाळी ६.२४ वाजता सुटेल. त्यामुळे एसी लोकलच्या फेऱ्यांची संख्या १४५ वरून १४७ होतील. दरम्यान, सकाळी १०.२४ वाजताची चर्चगेट-बोरिवली एसी धीमी लोकल आता गोरेगावपर्यंत धावेल. परतीची सेवा गोरेगावहून सुरू होईल. सायंकाळी ६.२२ आणि ७.०५ वाजताच्या चर्चगेट-विरार एसी जलद लोकलला बोरिवली येथे थांबा नसेल.
सहा फेऱ्या रद्द
चर्चगेट-मुंबई सेंट्रल आणि चर्चगेट-बोरिवली मार्गावरील कमी गर्दीच्या वेळेतील सहा फेऱ्या रद्द करण्यात आल्या. या सेवांची क्षमता प्रवाशांची मागणी अधिक असलेल्या मार्गांकडे वळविण्यात आली आहे. त्यामुळे फेऱ्यांची एकूण संख्या न वाढवता उपलब्ध सेवांचा अधिक परिणामकारक वापर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
----
नव्या वेळापत्रकातील सहा नवीन फेऱ्या
भाईंदर-विरार - सकाळी ७.४६
वांद्रे-चर्चगेट - सकाळी ११.५८
बोरिवली-भाईंदर - रात्री १०.१४
बोरिवली-विरार - रात्री १०.५१
विरार-बोरिवली - रात्री ११.५१
बोरिवली-भाईंदर - रात्री १२.२८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.