

पुनर्वापर क्षेत्रात तंत्रज्ञानाला प्राधान्य
आयात कच्च्या मालावरील अवलंबित्व कमी होणार
मुंबई, ता. ३१ : भारतातील पुनर्वापर (रिसायकलिंग) क्षेत्राचा पुढील टप्पा केवळ प्रमाणवाढीपुरता मर्यादित न राहता प्रगत तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण पुनर्वापरित साहित्य, घटकांची शुद्धता आणि सक्षम संकलन व्यवस्थेवर केंद्रित असेल. यामुळे आयातीत कच्च्या मालावरील अवलंबित्व कमी होऊन अधिक मजबूत आणि स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था उभारण्यास मदत होईल, असे तज्ज्ञांनी सांगितले.
मीडिया फ्यूजन आणि क्रेन कम्युनिकेशन्सतर्फे आयोजित ‘प्लॅस्टिक्स रिसायकलिंग शो इंडिया २०२६’ आणि ‘भारत रिसायकलिंग शो २०२६’ या तीनदिवसीय प्रदर्शनाला आजपासून सुरुवात झाली. या प्रदर्शनात १५० हून अधिक प्रदर्शक आणि २५० हून अधिक ब्रँड्स सहभागी झाले असून प्लॅस्टिक, धातू, ई-कचरा आणि बॅटरी पुनर्वापरातील आधुनिक तंत्रज्ञानाचे सादरीकरण करण्यात येत आहे.
मीडिया फ्यूजनचे व्यवस्थापकीय संचालक ताहेर पात्रावाला म्हणाले, भारतातील विखुरलेल्या पुनर्वापर परिसंस्थेला एकत्र आणण्याच्या दिशेने हा कार्यक्रम महत्त्वाचे पाऊल आहे. नियामक चौकट अधिक कठोर होत असताना आणि उद्योगांवर शाश्वत पद्धती स्वीकारण्याचा दबाव वाढत असताना, तांत्रिक त्रुटी दूर करणे, गुंतवणूक आकर्षित करणे आणि विविध क्षेत्रांतील भागीदारी वाढविण्यासाठी ही व्यासपीठे महत्त्वाची ठरतील.
--------
तांब्याची मागणी ३२ लाख टनांपर्यंत
मॅकिन्से अँड कंपनीचे वरिष्ठ सल्लागार आर. व्ही. श्रीधर यांनी, पुनर्वापर क्षेत्रातील पुढील वाढ ही गुणवत्ता, ट्रेसेबिलिटी आणि तंत्रज्ञानावर आधारित असेल, असे सांगितले. २०३०पर्यंत भारताची तांब्याची मागणी ३२ लाख टनांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज असून, सध्या सुमारे ३८ टक्के मागणी स्क्रॅपमधून पूर्ण केली जाते, असे त्यांनी नमूद केले.
--------
कडक ईपीआर नियम, अनिवार्य रिसायकल-कंटेंट मानके आणि जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानामुळे गेल्या दशकात प्लॅस्टिक पुनर्वापर क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. पुढील पाच ते दहा वर्षांत या बाजारपेठेची वाढ नऊ ते ११ टक्के चक्रवाढ वार्षिक दराने होण्याची अपेक्षा आहे; मात्र कचरा संकलन, उगमस्थानी कचरा वर्गीकरण आणि अनौपचारिक क्षेत्राला मुख्य प्रवाहात आणणे, ही आव्हाने कायम आहेत.
- शैलेंद्र सिंह, महासंचालक, असोसिएशन ऑफ प्लॅस्टिक रिसायकलर्स इंडिया
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.