

पूजेला महागाईची झळ!
कापूर, धूप, अगरबत्तीचे दर वाढले; गणेशोत्सवात महागाईचा फटका
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : गणरायाच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच यंदा पूजासाहित्याच्या बाजाराला महागाईची झळ बसली आहे. कापूर, धूप, अगरबत्ती, हार आणि प्रसादाच्या साहित्याच्या किमतीत गेल्यावर्षीच्या तुलनेत १० ते २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
विशेषतः भीमसेन कापूर आणि विविध प्रकारच्या धूपाच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने यंदा बाप्पाच्या पूजेसाठी भक्तांना अधिक खर्च करावा लागणार आहे. गणपती सजावटीच्या साहित्याचे विक्रेते मयुरेश खामकर यांच्या माहितीनुसार, पारंपरिक कापूरचा दर गेल्या वर्षी ८०० ते ९०० रुपये किलो होता. यंदा तो १,००० ते १,४०० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. तर गेल्या वर्षी १,००० ते १,१०० रुपये किलो असलेला भीमसेन कापूर यंदा सुमारे १,६०० रुपये किलोवर पोहोचला आहे.
भीमसेन कापूरला गेल्या काही वर्षांत विशेष मागणी आहे. कोविडनंतर ग्राहकांमध्ये या प्रकाराबाबत आकर्षण वाढले. पारंपरिक कापूर गोल किंवा चौकोनी आकारात मिळतो, तर भीमसेन कापूर चिप्सच्या स्वरूपात रॉ आणि अनफिनिश्ड अवस्थेत उपलब्ध होतो.
धूपाच्या बाजारातही दरवाढ झाली आहे. पावडर, वाटाणा, ड्रॉप आणि सळी अशा विविध प्रकारांनुसार धूपाचे दर बदलतात. गेल्या वर्षी ६०० ते १,२०० रुपयांच्या रेंजमध्ये मिळणारा धूप यंदा ८०० ते १,६०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. जवळपास प्रत्येक श्रेणीत किलोमागे २०० रुपयांची वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
अगरबत्तीच्या दरातही कंपन्यांनी साधारण १० ते १५ टक्क्यांनी वाढ केली आहे. अगरबत्तीच्या निर्मितीसाठी लागणारा काही कच्चा माल बाहेरील भागातून येत असल्याने त्याचा परिणाम अंतिम किमतीवर होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
हारांच्या किमतीवर प्लॅस्टिकच्या कच्च्या मालाच्या वाढलेल्या दराचा परिणाम झाला आहे. त्यामुळे हारांच्या किमतीत साधारण १० ते १५ टक्के वाढ झाली असून काही वस्तूंमध्ये ही वाढ २० टक्क्यांपर्यंत असल्याचे सांगण्यात येत आहे; मात्र या दरवाढीचा ग्राहकांच्या उत्साहावर फारसा परिणाम झालेला नाही.
भक्तांचा उत्साह कायम
‘बाप्पासाठी चांगली वस्तू घ्यायचीच’ या भावनेमुळे ग्राहकांकडून खरेदी सुरूच असल्याचे विक्रेत्यांचे निरीक्षण आहे. यंदाच्या बाजारात त्यामुळे एकीकडे महागाई आणि दुसरीकडे भक्तांचा कायम असलेला उत्साह, असे चित्र पाहायला मिळत आहे.
प्रसादाच्या साहित्याला फटका
प्रसादाच्या साहित्यालाही महागाईचा फटका बसला आहे. गूळ, गुळाचे मोदक, साखर, फुटाणे आणि ड्रायफ्रूट्सच्या किमतीतही वाढ जाणवत आहे.
गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या प्रत्येक साहित्याच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कितीही महागाई असली तरी आपल्या घरी गणेशोत्सव साजरा करणारे लोक आवडीने खरेदी करतात.
- मयुरेश खामकर, मालक, लालबाग
कसा आहे भाव?
पारंपरिक कापूर- १,००० ते १,४०० रुपये
भीमसेन कापूर- १,६०० रुपये
धूप- ८०० ते १,६०० रुपये
अगरबत्ती- दरामध्ये १० ते १५ टक्के वाढ
हार- १० ते १५ टक्के
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.