

कुर्ला, मालाड येथे एफडीएची कारवाई
खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित
मुंबई, ता. १ : अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मालाड आणि कुर्ल्यातील दोन खाद्य आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान गंभीर अनियमितता आणि अस्वच्छता आढळून आल्याने मालाडमधील मिठाई व भेळविक्री केंद्र तसेच कुर्ल्यातील एका हॉटेलचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मालाड येथील दिल्ली स्वीट अँड भेळपुरी हाऊसमध्ये कच्चे समोसे अस्वच्छ ठिकाणी तसेच उघड्या नाल्याजवळ ठेवण्यात आल्याचे आढळून आले. कोणतीही तपासणी न केलेले पाणी वापरले जात असल्याचेही तपासणीत समोर आले. तसेच संबंधित परवान्यात नमूद नसलेल्या लस्सी, मिठाई, पनीर आणि इतर खाद्यपदार्थांचे उत्पादन तसेच पुन्हा वेष्टन करण्याचे काम केले जात असल्याचे आढळले. या आस्थापनातील ३६ कर्मचाऱ्यांपैकी तब्बल २६ कर्मचाऱ्यांकडे आरोग्य तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र नसल्याचेही निदर्शनास आले. कुर्ल्यातील गुलजार मोहम्मदी हॉटेलच्या स्वयंपाकघरात झुरळांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून आला. सडलेल्या आणि खराब झालेल्या भाज्यांचा वापर केला जात असल्याचे, तसेच शिजवलेले अन्न उघड्यावर ठेवण्यात येत असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. याशिवाय हॉटेलमधील कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तंदुरुस्तीची प्रमाणपत्रे, लसीकरणाची माहिती आणि अन्नसुरक्षेसंदर्भातील प्रशिक्षणाच्या नोंदीही उपलब्ध नसल्याचे आढळून आले. या गंभीर त्रुटींची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने दोन्ही आस्थापनांचे परवाने निलंबित केले आहेत. तसेच खाद्यपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, विक्री आणि वितरण पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.