

प्रत्येक शाळेत बदल घडेल ः दादाजी भुसे
‘चला शाळेत जाऊ या’ची घोषणा
मुंबई, ता. २ : राज्यातील प्रत्येक शाळेत स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी, गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण आणि विद्यार्थीकेंद्रित वातावरण निर्माण करण्यासाठी शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शाळांमध्ये भेट देऊन काम करावे. बैठका आणि आढाव्यांमधील नियोजनाचे प्रतिबिंब शाळांमध्ये आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये दिसले पाहिजे. यासाठी राज्यभर ‘चला शाळेत जाऊ या’ हे विशेष अभियान राबविण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केली.
शिक्षणाशिवाय पर्याय नाही, त्यामुळे ज्ञानमंदिरांचे सशक्तीकरण ही सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबईतील बालभवन येथे आयोजित शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ‘शिक्षण संवाद’ या एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. या वेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांच्यासह विभागातील सर्व संचालक, उपसंचालक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. भुसे म्हणाले, की शिक्षण विभागाने प्रशासकीय कामकाजाबरोबरच विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समित्या आणि ग्रामस्थ यांच्याशी थेट संवाद साधला पाहिजे. राज्यातील आठही विभागांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची जिल्हानिहाय जबाबदारी निश्चित करून प्रत्येक जिल्ह्याचा स्वतंत्र आढावा घेण्यात येणार आहे. हे अधिकारी चार दिवसांच्या विशेष दौऱ्यात शाळांना भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीचे मूल्यांकन करतील. ज्या शाळांमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील त्या शाळांना विविध माध्यमांतून प्रोत्साहन दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
...
मंत्री भुसे म्हणाले...
- पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छ स्वच्छतागृहे, सुरक्षित इमारती आणि स्वच्छ परिसर यांना प्रथम प्राधान्य दिले गेले पाहिजे.
- अनेक सुधारणा लोकसहभागातून आणि स्थानिक पातळीवरील पुढाकारातून तातडीने करता येऊ शकतात.
- जिल्हा नियोजन समिती निधी, विविध विकास योजना तसेच कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधीच्या माध्यमातून शाळांच्या विकासासाठी आवश्यक संसाधने उपलब्ध करून द्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.