

महिंद्रच्या नागपूर प्रकल्पात कौशल्य विकासावर भर
पाच लाख वाहने, एक लाख ट्रॅक्टरच्या निर्मितीची क्षमता
मुंबई, ता. २ : नागपूरमधील अतिरिक्त बुटीबोरी येथे उभारण्यात येणाऱ्या महिंद्र अँड महिंद्रच्या एकात्मिक वाहन व ट्रॅक्टर निर्मिती प्रकल्पासाठी कंपनीकडून मनुष्यबळ तयार करण्यावर भर दिला जात आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे ८०० एकर जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीला प्राधान्य दिले जाणार आहे.
विदर्भातील सुमारे १,५०० एकर जागेवर हा ग्रीनफिल्ड प्रकल्प उभारला जाणार आहे. पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर येथे दरवर्षी पाच लाख वाहने आणि एक लाख ट्रॅक्टर तयार करण्याची क्षमता असेल. त्यामुळे हा महिंद्रचा देशातील सर्वात मोठा एकात्मिक उत्पादन प्रकल्प ठरणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथील सप्लायर पार्कमधून नागपूरमधील या प्रकल्पासह चाकण आणि नाशिक येथील महिंद्रच्या प्रकल्पांना सुटे भाग पुरवले जाणार आहेत. नवीन प्रकल्पासाठी विविध प्रकारच्या पॉवरट्रेन तसेच भविष्यातील तंत्रज्ञानावर आधारित वाहने आणि ट्रॅक्टर तयार करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ विकसित केले जाणार आहे. त्यासाठी कुशल कर्मचाऱ्यांची निवड, प्रशिक्षण आणि कौशल्यविकास केला जाईल.
----
कौशल्य विकास केंद्र उभारणार
महिंद्रच्या सध्याच्या प्रकल्पांमध्ये काम करणाऱ्या अनुभवी कर्मचाऱ्यांच्या कौशल्याचा नवीन प्रकल्पासाठी उपयोग केला जाणार आहे. पुढील दोन ते तीन वर्षांत या कर्मचाऱ्यांना नवीन प्रकल्पातील विविध पदांसाठी निवड प्रक्रियेत सहभागी होता येईल. या प्रक्रियेत तांत्रिक कौशल्य, कामातील वर्तन, कंपनीच्या मूल्यांशी सुसंगतता आणि संघभावनेने काम करण्याची क्षमता तपासली जाणार आहे. याशिवाय, यांत्रिक कामे, वेल्डिंग आणि पेंटिंग यांसारख्या क्षेत्रांत प्रशिक्षण देण्यासाठी नागपूरमध्ये कौशल्य विकास केंद्र उभारण्याची कंपनीची योजना आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.