

तेजसच्या प्रवासात मोदकांचा गोडवा!
गणेशोत्सवापुरती आयआरसीटीसीची खास मेजवानी; मुंबई-मडगाव तेजसच्या सर्व प्रवाशांना उकडीचे मोदक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : गणरायाच्या आगमनासाठी कोकणच्या दिशेने निघालेल्या चाकरमान्यांचा यंदाचा रेल्वे प्रवास आणखी गोड होणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयआरसीटीसीने मुंबई-मडगाव तेजस एक्स्प्रेसमधील सर्व प्रवाशांना पारंपरिक उकडीचे मोदक देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे हा मोदकांचा खास बेत केवळ गणेशोत्सवाच्या कालावधीतच उपलब्ध असणार आहे. त्यामुळे धावत्या रेल्वेतच गणेशोत्सवाचा गोडवा आणि कोकणच्या घरगुती चवीची अनुभूती प्रवाशांना मिळणार आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्याच्या विविध भागांत नोकरी-व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले हजारो चाकरमानी गणेशोत्सवासाठी दरवर्षी कोकणात परततात. गणपतीच्या आगमनापूर्वीच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते. या सणासुदीच्या वातावरणात प्रवाशांच्या प्रवासाला खास अनुभव देण्यासाठी आयआरसीटीसीने तेजस एक्स्प्रेसमध्ये मोदक वाटपाचे नियोजन केले आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्याने मध्य रेल्वेसह इतर रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. नियमित गाड्यांबरोबरच विशेष सेवांचे आरक्षणही मोठ्या प्रमाणात झाले आहे. या पार्श्वभूमीवर आयआरसीटीसीच्या मोदक वाटपामुळे तेजस एक्स्प्रेसच्या प्रवासाला गणेशोत्सवाचा खास रंग मिळणार आहे. गणरायाच्या दर्शनासाठी गावी निघालेल्या चाकरमान्यांचे रेल्वेच्या डब्यातच मोदकाने ‘गोड स्वागत’ होणार आहे.
दोन्ही दिशांच्या गाड्यांमध्ये वाटप
आयआरसीटीसीच्या खानपान आणि पर्यटन विभागामार्फत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. गाडी क्रमांक २२११९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव तेजस एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक २२१२० मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तेजस एक्स्प्रेस या दोन्ही गाड्यांमधील सर्व प्रवाशांना उकडीचे मोदक वितरित केले जाणार आहेत. मात्र, हा विशेष खाद्यपदार्थ नियमित मेन्यूचा भाग नसून गणेशोत्सवापुरताच मर्यादित राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत तेजस एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोदकाचा आस्वाद घेता येणार आहे.
घरच्या चवीचा प्रवासात अनुभव
गणेशोत्सवात मोदकाला विशेष महत्त्व आहे. गणरायाचा नैवेद्य म्हणून उकडीचे मोदक करण्याची महाराष्ट्रात प्रथा आहे. विशेषतः कोकणातील गणेशोत्सवात या पारंपरिक पदार्थाला वेगळे स्थान आहे. त्यामुळे गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वेच्या डब्यातच मोदक मिळणार असल्याने प्रवासात घरच्या सणाची आठवण जागी होणार आहे. गणेशोत्सव हा मुंबई आणि कोकणाला जोडणारा भावनिक धागाही आहे. नोकरी-व्यवसायासाठी मुंबईत राहणारे चाकरमानी वर्षभर गावी जाण्याची वाट पाहतात. गणपतीच्या काळात कुटुंबासह सण साजरा करण्यासाठी ते मोठ्या संख्येने कोकणात परततात. त्यामुळे आयआरसीटीसीचा हा उपक्रम केवळ खानपानापुरता मर्यादित न राहता गावाकडच्या सणाची चव देणारा अनुभव ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.