

किसान रेलमध्ये ‘किसान’ माल ३९ टक्के!
पार्सलचा कब्जा; ९७ फेऱ्यांत १३,७७८ टन मालवाहतूक, ६१ टक्के हार्ड पार्सल
नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : शेतकऱ्यांचा नाशवंत शेतमाल देशाच्या विविध बाजारपेठांपर्यंत जलद आणि सुरक्षित पोहोचविण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वेच्या देवळाली-दानापूर ‘शेतकरी समृद्धी’ विशेष किसान रेल सुरू केली; मात्र त्यामध्ये शेतमाल दुय्यम ठरल्याचे धक्कादायक चित्र उघड झाले आहे. १५ ऑक्टोबर २०२४पासून ३ सप्टेंबर २०२६पर्यंत झालेल्या ९७ फेऱ्यांत १३,७७८.४९ टन मालाची वाहतूक झाली. त्यापैकी केवळ ५,३४५.३४ टन म्हणजे ३९ टक्के माल नाशवंत शेतमालाचा आहे. उलट, ८,४३३.१५ टन म्हणजे ६१ टक्के माल हार्ड पार्सलचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सुरू झालेल्या या सेवेवर व्यावसायिक पार्सलचा वरचष्मा आहे.
किसान रेलच्या एकूण क्षमतेचा मोठा हिस्सा शेतमालासाठी वापरला जाईल, अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात प्रत्येक १०० टन मालामागे केवळ ३९ टन शेतमाल आणि ६१ टन हार्ड पार्सल अशी स्थिती आहे. म्हणजेच शेतमालापेक्षा इतर मालाची वाहतूक २२ टक्के अधिक आहे. ९७ फेऱ्यांनंतरही हे प्रमाण सुधारले नसल्याने शेतमाल वाहतुकीला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. नाशवंत शेतमालाच्या वाहतुकीत कांदा आणि डाळिंबाचा वाटा सर्वाधिक आहे. आतापर्यंत १,६३७.६१ टन कांदा आणि १,३७०.८८ टन डाळिंबाची वाहतूक झाली. दोन्ही मिळून ३,००८.४९ टन मालाची वाहतूक झाली असून, नाशवंत शेतमालाच्या एकूण वाहतुकीत त्यांचा वाटा सुमारे ५६ टक्के आहे. याशिवाय कँडी, सरिफा, आले, द्राक्षे, लिंबू, भेंडी, पेरू, मासे आणि अंडी यांचीही वाहतूक झाली; मात्र कांदा आणि डाळिंब वगळता इतर नाशवंत शेतमालाचा प्रतिसाद तुलनेने मर्यादितच राहिला आहे. तर ‘कँडी प्रॉडक्ट’ ४,७६७.६० टनांसह सर्वाधिक आहे.
प्रभावी प्रयत्नांची गरज
शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि कृषी क्षेत्रातील व्यापाऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी मध्य रेल्वेकडून अधिक प्रभावी प्रयत्नांची गरज आहे. अन्यथा, शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सुरू झालेली किसान रेल प्रत्यक्षात व्यावसायिक पार्सल वाहतुकीचे साधन बनण्याचा धोका आहे.
आकडे काय सांगतात?
- १५ ऑक्टोबर २०२४ ते ३ सप्टेंबर २०२६ - कालावधी
- ९७ - एकूण फेऱ्या
- १३,७७८.४९ टन - एकूण मालवाहतूक
- ५,३४५.३४ टन - नाशवंत शेतमाल
- ३९% - शेतमालाचा वाटा
- ८,४३३.१५ टन - हार्ड पार्सल
- ६१% - हार्ड पार्सलचा वाटा
- १,६३७.६१ टन - कांदा
- १,३७०.८८ टन - डाळिंब
- ३,००८.४९ टन - कांदा + डाळिंब
- ४,७६७.६० टन - कँडी प्रॉडक्ट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.