

फुकट्या प्रवाशांना पश्चिम रेल्वेचा दणका
पाच महिन्यांत १३.४७ लाख जणांकडून १०० कोटींचा दंड
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : तिकीट न काढता किंवा अनियमितपणे प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांविरोधात पश्चिम रेल्वेने कारवाईचा धडाका लावला आहे. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत १३.४७ लाख फुकटे आणि अनियमित प्रवासी तिकीट तपासणीत सापडले. त्यांच्याकडून १००.४२ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. विनाबुक केलेल्या सामानाच्या प्रकरणांचाही या आकडेवारीत समावेश आहे.
पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरीय मार्गावरही विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. एप्रिल ते ऑगस्टदरम्यान ४.६५ लाख फुकटे आणि अनियमित प्रवासी पकडण्यात आले. त्यांच्याकडून २५.६५ कोटी रुपये दंड वसूल झाला. लोकलसह मेल-एक्स्प्रेस, पॅसेंजर आणि विशेष गाड्यांमध्ये वरिष्ठ वाणिज्य अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तपासणी करण्यात आली.
ऑगस्टमध्ये २.१३ लाख जण सापडले
केवळ ऑगस्ट महिन्यातच २.१३ लाखांहून अधिक फुकटे आणि अनियमित प्रवासी आढळले. त्यांच्याकडून १७.१६ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. त्यामुळे पाच महिन्यांच्या कारवाईत ऑगस्टचा वाटाही मोठा असल्याचे दिसून येते.
एसी लोकलमधील दंडात १७२ टक्के वाढ
एसी लोकलमध्ये सामान्य तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्यांवरही पश्चिम रेल्वेने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. एप्रिल ते ऑगस्टदरम्यान एसी उपनगरीय सेवांमध्ये ७८ हजार ६०० दंडात्मक प्रकरणे नोंदविण्यात आली. त्यातून ३.२६ कोटी रुपये वसूल झाले. गेल्या वर्षी याच कालावधीत ३६ हजार ४८० प्रकरणांतून १.२० कोटी रुपये वसूल करण्यात आले होते.
यंदा एसी लोकलमधील दंडाची रक्कम गेल्या वर्षीच्या तुलनेत १७२ टक्क्यांनी वाढली आहे. तर कारवाई झालेल्या प्रकरणांची संख्या सुमारे ११६ टक्क्यांनी वाढली आहे. महसुलाची गळती रोखण्यासाठी आणि अधिकृत तिकीट घेऊन प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून तिकीट तपासणी मोहिमा पुढेही सुरू राहणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.