थरांचा थरार, ढोल-ताशांचा गजर; दादर ते दहिसर मुंबई झाली गोविंदामय!

थरांचा थरार, ढोल-ताशांचा गजर; दादर ते दहिसर मुंबई झाली गोविंदामय!
Published on

थरांचा थरार, ढोल-ताशांचा गजर
दादर ते दहिसर मुंबई झाली गोविंदामय
​सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषात शनिवारी मुंबई अक्षरशः गोविंदामय झाली. दादर, लालबाग, परळ या पारंपरिक केंद्रांपासून ते घाटकोपर, अंधेरी, बोरिवली आणि दहिसरपर्यंत दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला होता. उंच मानवी मनोरे, ढोल-ताशांचा गजर आणि डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई अशा उल्हसित वातावरणात संपूर्ण शहरात गोपाळकाला मोठ्या जल्लोषात साजरा झाला.

​पहाटेपासूनच रंगीबेरंगी गणवेशातील गोविंदा पथके शहराच्या विविध भागांत दाखल झाली होती. यंदाच्या उत्सवात नऊ थरांचे आव्हान गाठण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. काही आयोजकांनी अकरा थरांच्या कामगिरीसाठी विशेष बक्षिसे जाहीर केल्यामुळे स्पर्धेची रंगत अधिक वाढली. पहिला थर रचण्यापासून ते सर्वांत वरच्या गोविंदाने हंडीला स्पर्श करेपर्यंत उपस्थितांचा श्वास रोखून धरणारा थरार प्रत्येक चौकात अनुभवायला मिळाला.

​या उत्सवात केवळ भव्यता नव्हती, तर जिद्द आणि समावेशकतेचे अनोखे दर्शनही घडले. संजीवनी फाउंडेशनने बोरिवली, सांताक्रूझ, मालाड, कांदिवली येथे दादर येथील आयडीयल तेथे नयन फाउंडेशनच्या दृष्टिदोष असलेल्या महिला गोविंदांनी यंदा तीन थरांचा मनोरा यशस्वीपणे उभारून आत्मविश्वासाची नवी व्याख्या मांडली. २०१७ पासून सुरू असलेली त्यांची ही परंपरा यंदाही प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरली. दुसरीकडे, चिमुरड्या बालगोविंदांनीही कृष्णवेषात छोटे मनोरे रचून उपस्थितांची मने जिंकली. एवढेच नव्हे तर महिला प्रवाशांनी धावत्या मुंबई लोकलच्या डब्यात फुगे आणि पताका लावून दहीहंडी साजरी केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमावर चांगलाच चर्चेत राहिला.

सामाजिक संदेश देणारे देखावे
​घाटकोपरच्या टिळकवाडी परिसरासह अनेक उपनगरांमध्ये मोठ्या आयोजनांमुळे वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले होते. नामांकित मंडळांनी केवळ थरांचा थरारच दाखवला नाही, तर पर्यावरण आणि सामाजिक संदेश देणारे देखावेही सादर केले. गोविंदाच्या निमित्ताने दिवसभर साहस, शिस्त आणि सामाजिक ऐक्याच्या जोरावर यंदाची दहीहंडी मुंबईकरांसाठी अविस्मरणीय सोहळा ठरली.
......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com