लोककलेच्या तालावर मुंबईकर थिरकले!

लोककलेच्या तालावर मुंबईकर थिरकले!
Published on

लोककलेच्या तालावर मुंबईकर थिरकले!
‘द फोक आख्यान’च्या १६३व्या प्रयोगाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई, ता. ६ : मेघगर्जनेला लाजवतील अशा गगनभेदी आवाजात प्रेक्षकांनी दिलेल्या घोषणा, लोकगीतांच्या तालावर प्रेक्षकांनी उभे राहून केलेले बेधुंद नृत्य, मराठमोळ्या वाद्यांची जुगलबंदी, वन्स मोअर मराठीत म्हणा, प्रेयसीला मराठीत ‘प्रपोज’ करा, अशा संवादात, मराठमोळ्या वातावरणात, अत्यंत उत्साही प्रतिसादात, ‘सकाळ’ आयोजित ‘द फोक आख्यान’चा १६३वा कार्यक्रम पार पडला.
जन्माष्टमीच्या दिवशी माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात हा नितांत सुंदर कार्यक्रम झाला. नव्या पिढीपर्यंत महाराष्ट्राची लोककला, महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा पोहोचवण्यासाठी तरुण कलाकारांनी हा कार्यक्रम तयार केला आहे. यातील देवीची गीते, श्रीकृष्णाचे गीते, विठ्ठलाची गीते यांच्यासह मराठमोळ्या वाद्यांच्या जुगलबंदींना प्रेक्षकांनी अत्यंत जोरदार प्रतिसाद दिला. विठ्ठल, श्री गणेश, श्रीकृष्ण यांचा जयजयकार प्रेक्षक करीत होते. छत्रपती शिवरायांच्या गाण्याला तर प्रेक्षक उभे राहून ताल धरून बेभान होऊन नाचत होते. छत्रपती शिवराय, धर्मवीर संभाजीराजे यांच्या गगनभेदी घोषणा देत होते. हे पाहता मराठी लोककला या परदेशी नृत्य संगीतापेक्षा कोठेही कमी नाहीत, हेच पदोपदी जाणवते, अशी प्रतिक्रियाही उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
अमेरिका दौऱ्यानंतर हा पहिलाच कार्यक्रम होता. माझ्या पांडुरंगाची वारी या गीतालाही असाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सोबत निवेदकाचे सुंदर निवेदन, सध्याच्या परिस्थितीवर टोमणे मारत केलेले भाष्य, विसर्जन मिरवणुकांमधील डीजेची भिंत, हृदयाची धडधड वाढवायला डीजे कशाला हवा, हलगी ढोलकीचा ताल पुरेसा आहे, या त्यांच्या निवेदनाला प्रेक्षकांचा प्रतिसाद तुफानी होता.
छत्रपती शिवरायांवरील स्वराज्य तोरण बांधीलं, हे गाणं म्हणजे संपूर्ण कार्यक्रमातील कळसाध्याय होता. प्रेक्षक देहभान विसरून या गाण्याच्या तालावर झुलत होते. छत्रपती शिवराय, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयजयकाराच्या घोषणा देत होते. गायकाने सांगितल्यानुसार त्याच्या मागे काही ओळीही प्रेक्षकांनी म्हटल्या. प्रेक्षक एवढे धुंद झाले होते की, गाणे संपल्यानंतर प्रेक्षकांनी आता आपल्याच खुर्च्यांवर बसा, आपल्याच बायकोच्या शेजारी बसा, अशी मजेदार सूचनाही गमतीत निवेदकाला द्यावी लागली. या गाण्याला प्रेक्षकांनी वन्स मोअर दिल्यावर वन्स मोअर म्हणू नका, मराठीत बोला. पुन्हा एकदा, परत एकदा असे सांगा, या निवेदकाच्या सूचनेलाही प्रेक्षकांनी असाच प्रतिसाद दिला.
वाघ्या मुरळीचे महत्त्व सांगणारे निवेदन, हे भोळ्या माझ्या खंडेराया, देवा तुला दिली बाणाईची आण यांनाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. गळ्यात घातलेल्या झांजा वाजवत कलाकारांनी केलेले तीन पावली नृत्य, तुणतुणे-डफ-खंजिरी-पखवाज यांची जुगलबंदी यावरही रसिकांनी टाळ्यांनी ताल धरला. मराठी सणाला आपल्या प्रेयसीला मराठीतच प्रपोज करा, वेगवेगळ्या इंग्रजी डेच्या मागे धावू नका, हे निवेदकाचे आवाहनही तरुण प्रेक्षकांना मनोमन पटले. राधा कृष्णाला म्हणते तुझी आठवण साखरेपेक्षाही महाग झाली, हे सद्यःस्थितीवरील भाष्यदेखील लोकांच्या मुखावर स्मितहास्य खेळवून गेले.

टाळ्या-शिट्ट्यांचा पाऊस
वाद्यांच्या तालावर कलाकारांनी खड्या आवाजात म्हटलेल्या येळकोट येळकोट जय मल्हारच्या पहिल्या माळेपासून प्रेक्षकांनी टाळ्या-शिट्ट्यांचा पाऊस पाडला. प्रथम वंदीला गणेश, पेंद्याने कृष्णाला मारलेली हाक गोपाळा रे कुठे गेला मला सोडूनी, या गाण्यानंतर प्रेक्षकांनी गणपती आणि कृष्णाचा प्रचंड जयजयकार केला.

शेलार, शिर्के यांचा सत्कार
याप्रसंगी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार हजर होते. या वेळी ‘सकाळ’च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रायोजक ‘रॉयल एनफील्ड’चे अमेय शिर्के यांचा तसेच षण्मुखानंद हॉलचे विश्वस्त गणेश अय्यर यांचाही सत्कार करण्यात आला.

‘द फोक आख्यान’चे सादरीकरण अत्यंत उत्कृष्ट असल्याचे प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांवरून दिसून येत होते. उत्तम कलाकार, सुश्राव्य गायन आणि वाद्यांचा सुरेख मेळ असला, तर महाराष्ट्राची परंपरागत सांस्कृतिक कलादेखील लोकांना ठेका धरायला लावते, हेच आज दिसून आले.
– प्रेरणा देशभ्रतार, आयुक्त एमएसएमई
व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र लघुउद्योग महामंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com