

गणेश गल्लीच्या देखाव्यात ‘संतभूमी’चा जागर
संत तुकारामांचे वैकुंठगमन, ज्ञानेश्वरांची चालती भिंत; संतपरंपरेचा समृद्ध वारसा उलगडणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : गणेशोत्सव म्हटले की भव्य सजावट, आकर्षक देखावे आणि भक्तिमय वातावरणासाठी प्रसिद्ध असलेल्या गणेश गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा संतपरंपरेला केंद्रस्थानी ठेवत ‘संतभूमी’ ही आगळीवेगळी संकल्पना साकारली आहे. महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा समृद्ध वारसा आणि संतांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग भाविकांसमोर जिवंत करण्याचा प्रयत्न या देखाव्यातून करण्यात आला आहे.
या भव्य देखाव्यात संत तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन विशेष लक्षवेधी ठरणार आहे. सुमारे ५० फूट उंच गरुडावर आरूढ होऊन संत तुकाराम महाराज वैकुंठाच्या दिशेने जात असल्याचे दृश्य भव्य स्वरूपात उभारण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी चालविलेल्या भिंतीचा ऐतिहासिक प्रसंगही देखाव्याचा महत्त्वाचा भाग आहे.
संत गोरा कुंभार यांच्या जीवनातील भक्ती आणि समर्पणाचा प्रसंगही प्रभावीपणे साकारण्यात आला आहे. माती मळताना विठ्ठलभक्तीत तल्लीन झालेल्या गोरा कुंभारांना आपल्या मुलाचा पायाखाली मृत्यू होत असल्याचेही भान राहिले नाही, अशी आख्यायिका या माध्यमातून भाविकांसमोर मांडण्यात आली आहे. संतांच्या अतूट भक्तीचे दर्शन घडविणारे हे प्रसंग देखाव्याला आध्यात्मिक आणि सामाजिक आशय देतात.
गणेश गल्लीतील गणरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक दाखल होतात. यंदाही दररोज दीड लाखांहून अधिक भाविक येण्याची शक्यता मंडळाने व्यक्त केली आहे. मंडळाचे सरचिटणीस स्वप्नील परब यांनी सांगितले की, संतांचे विचार, त्यांचे समाजप्रबोधनाचे कार्य आणि त्यांनी दिलेली मूल्ये नव्या पिढीपर्यंत पोहोचावीत, हा ‘संतभूमी’मागील मुख्य उद्देश आहे. भक्ती, अध्यात्म, इतिहास आणि सामाजिक प्रबोधन यांचा मेळ साधणारा हा देखावा गणेशोत्सवातील विशेष आकर्षण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्वयंसेवकांना विमा संरक्षण
वाढती गर्दी लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्थेलाही विशेष महत्त्व देण्यात आले आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसह मंडळाचे कार्यकर्ते आणि स्वयंसेवक यांनाही विमा संरक्षण देण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.