

कुपोषित बालकांच्या टीबी तपासणीत वाढ
पाच वर्षांत ९० टक्के प्रमाण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये दाखल होणाऱ्या कुपोषित बालकांच्या क्षयरोगाच्या तपासणीचे प्रमाण वाढले आहे. २०२१ ते जुलै २०२६ या कालावधीत २९,८७५ बालकांपैकी २६,८५७ बालकांची तपासणी करण्यात आली. तपासणीचे हे प्रमाण ८९.९ टक्के आहे. यंदा जुलैपर्यंत दाखल झालेल्या ३,०१७ बालकांपैकी २,८३५ बालकांची तपासणी झाली असून, त्याचे प्रमाण ९४ टक्के आहे.
कुपोषण व क्षयरोग यांच्यातील संबंध लक्षात घेऊन पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये दाखल बालकांची टीबीसाठी लक्षणे तसेच टीबी रुग्णाच्या संपर्काचा इतिहास तपासला जातो. संशयित प्रकरणांमध्ये आवश्यकतेनुसार नमुना तपासणी, सीबी-नॅट किंवा ट्रूनॅट आणि छातीचा एक्स-रे यांसारख्या निदान सुविधांचा वापर केला जात आहे. आकडेवारीनुसार, २०२२ मध्ये या केंद्रांमधून टीबीचे निदान झालेल्या २३ बालकांवर उपचार सुरू करण्यात आले होते. ही संख्या २०२५ मध्ये सातवर आली, तर जुलै २०२६ पर्यंत तीन बालकांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. तपासणीचे प्रमाण वाढले असतानाच निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. जटिल, औषध-प्रतिरोधक किंवा निदानास आव्हानात्मक बाल टीबीच्या प्रकरणांसाठी बाल टीबी उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोषण पुनर्वसन केंद्रांमधील टीबी तपासणी आणि निदानाची माहिती नि:क्षय पोर्टलशी जोडण्याचे कामही सुरू आहे. त्यामुळे रुग्णांची नोंदणी, उपचारांचा मागोवा आणि उपचारांच्या परिणामांचे परीक्षण करता येणार असल्याचे सांगण्यात आले.
---
बालसंपर्कांचीही तपासणी
टीबी रुग्णाच्या संपर्कात आलेल्या मात्र लक्षणे नसलेल्या बालकांमध्ये आजार होण्याचा धोका लक्षात घेऊन टीबी प्रतिबंधात्मक उपचार देण्यासाठी घरगुती आणि पोषण पुनर्वसन केंद्रांवरील संपर्क तपासणी वाढविण्यात आली आहे. टीबीचे निदान झालेल्या बालकांना नि:क्षय पोषण योजना आणि नि:क्षय मित्र उपक्रमांतर्गत उपलब्ध पोषण सहाय्याशी जोडले जात आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.