

समान पाणी वितरणाला सर्वोच्च प्राधान्य
उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन : बांगर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : मुंबईला पाणीपुरवठा करणारे सर्व तलाव भरले असून, उपलब्ध पाणीसाठा वर्षभर पुरेल असे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शहराच्या पाणीप्रश्नावर आता प्रशासकीय स्तरावर नियमित आढावा घेतला जाणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी सोमवारी (ता. ७) दिली. त्यांनी पालिका मुख्यालयात पाणीपुरवठ्यासंदर्भात आढावा बैठक घेतली तसेच उपलब्ध पाण्याचे समसमान व परिणामकारक वितरण होईल यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश त्यांनी जल अभियंता विभागाला दिले.
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पाणी वितरण व्यवस्थेतील त्रुटींमुळे शेवटच्या टोकावरील आणि उंचावरील भागांतून नेहमीच पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी येतात. परिणामी त्याचे पडसाद सभागृह, स्थायी समितीत उमटतात याची गंभीर दखल पालिका अतिरिक्त आयुक्त बांगर यांना घेतली आहे. याबाबत प्रभावी उपाययोजना त्यांनी सुरू केल्या आहेत. अपुऱ्या आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणाऱ्या भागांतील पाणीपुरवठ्याच्या परिस्थितीचा नियमित आढावा घेऊन आवश्यकतेनुसार पाणी वितरणाचे नियोजन करावे, पाणीपुरवठ्यातील असमतोल दूर करावा आणि पाणी वितरण व्यवस्था प्रभावीपणे राबवावी तसेच समान पाणी वितरण करण्याचे निर्देश बांगर यांनी सर्व विभाग कार्यालयांना दिले आहेत.
नगरसेवक आणि नागरिकांची पाणीपुरवठ्याबाबत कमीत कमी गैरसोय होईल तसेच उपलब्ध पाण्याचे समसमान व परिणामकारक वितरण होईल, यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देशही त्यांनी जल अभियंता विभागाला दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.