

गणेशोत्सवात ‘आवाज’ नव्हे, भक्तीचा गजर करा!
ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्याचे समन्वय समितीचे मंडळांना आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषणाचे नियम पाळण्याचे आणि सणाचे पावित्र्य राखण्याचे जोरदार आवाहन केले आहे. आरती आणि उत्सवादरम्यान आवाजाची विहित मर्यादा पाळा, डीजे किंवा लाऊडस्पीकरवर बीभत्स गाणी वाजवणे पूर्णपणे टाळा, असे आवाहन समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहीबावकर यांनी केले.
माध्यमांशी बोलताना ॲड. दहीबावकर यांनी गणेशोत्सवातील विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर समितीची भूमिका मांडली. कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी मंडळांनी घ्यावी.
गणेशोत्सवात वितरित केल्या जाणाऱ्या प्रसादाची सुरक्षितता आणि शुद्धता टिकवण्यासाठी एफडीएने मानक कार्यप्रणाली जारी करावी, अशी मागणी समन्वय समितीने केली होती; मात्र अद्यापही एसओपी मिळालेली नाही. आता उत्सव अगदी तोंडावर आलेला असताना बैठकांना बोलावले जात आहे; इतक्या कमी वेळेत या सर्व गोष्टींची अंमलबजावणी कशी होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
२००८ मध्ये ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत श्रींच्या मूर्तीची उंची १८ फुटांपेक्षा जास्त असू नये, असा निर्णय झाला होता. पुढील चार वर्षे जुन्या मंडळांना सूट देऊन याची सुरळीत अंमलबजावणी झाली; मात्र नंतर पुन्हा मूर्तींच्या उंचीची स्पर्धा सुरू झाली.
प्लास्टर ऑफ पॅरिसचा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट असला तरी, पर्यावरणपूरक विसर्जनासाठी समन्वय समितीने पूर्वी राबवलेली ‘चक्राकार विसर्जन पद्धत’ उपयुक्त ठरत आहे. मुंबईत कृत्रिम तलावांची संख्या सातत्याने वाढत असून २०२४ मध्ये २०४, २०२५ मध्ये २९८ तर २०२६ मध्ये ही संख्या ३५५ वर पोहोचली आहे. वाढती गरज लक्षात घेता महापालिकेने कृत्रिम तलावांची संख्या ५०० पर्यंत वाढवावी, अशी मागणी समितीने केली आहे.
उत्सवाचे नियोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी तरुण पिढीने पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. महापालिका आयुक्त प्रशासकीय पातळीवर उत्तम काम करीत असून त्यांनी छोट्या गणेशोत्सव मंडळांच्या अडचणींचाही सहानुभूतीने विचार करावा. तसेच समाजोपयोगी उपक्रम राबवणाऱ्या चांगल्या गणेशोत्सव मंडळांना शासनाने प्रोत्साहन म्हणून अनुदान द्यावे, अशी मागणीही ॲड. दहीबावकर यांनी शेवटी केली.
भजन, कीर्तनांना प्राधान्य द्या!
नियमांनुसार ठरवून दिलेल्या डेसिबलच्या मर्यादेतच ध्वनिक्षेपक वाजवले जावेत. पुण्यातील गणेशोत्सवात डीजे वापरला गेला तरी तेथे आवाजाची मर्यादा राखली गेली होती, हाच कित्ता मुंबईतही गिरवला गेला पाहिजे. उत्सवात बीभत्स आणि अश्लील गाणी लावण्याऐवजी भजने, कीर्तने, भक्तिगीते आणि जुनी अर्थपूर्ण भावगीते लावावीत, असे आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केले आहे.
उंचीबाबत सरकारने निर्णय घ्यावा!
बाप्पाच्या स्वरूपात केले जाणारे चुकीचे बदल हे शास्त्रसंमत नाहीत. पूर्वी अशा गोष्टींना अटकाव केला जात होता. मूर्तींच्या उंचीबाबत शासन आणि पालिकेने सर्व बाबींचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा, त्याला आमचा आक्षेप असणार नाही, असे समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहीबावकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.