डॉक्टर्स असोसिएशनची न्यायालयात धाव

डॉक्टर्स असोसिएशनची न्यायालयात धाव
Published on

डॉक्टर्स असोसिएशनची न्यायालयात धाव
पालघर रुग्णालयातील राड्याप्रकरणी आज सुनावणी


सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : पालघर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या गोविंदा पथकातील सहकाऱ्यांच्या नातेवाइकांकडून उपचारादरम्यान तपासणीचे पैसे मागितल्याने शिवसैनिकांनी (शिंदे गट) रुग्णालयात शिवीगाळ करत धुडगूस घातला. त्यावरच न थांबता शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली. त्याविरोधात पालघर डॉक्टर्स असोसिएशनने सोमवारी (ता. ७) उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्या याचिकेवर मंगळवारी ( ता. ८) तातडीने सुनावणीची शक्यता आहे.

पालघर डॉक्टर्स असोसिएशनने प्रभारी मुख्य न्या. रवींद्र घुगे यांच्यासमोर याचिका सादर केली. घडलेली घटना दुर्दैवी असून, एकीकडे, डॉक्टरांना मारहाण केली, त्यांना धमकावण्यात आले, आता त्यांच्या विरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचा स्थानिक पोलिसांवर दबाव आणला जात असल्याचा दावा असोसिएशनकडून ॲड. निरंजन मुंदरगी यांनी केला. या प्रकरणात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे, शहरप्रमुख राहुल घरत, आमदारपुत्र रोहित गावित यांच्यासह १७ जणांविरुद्ध पालघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याची गंभीर दखल घेऊन न्यायालयाने याचिकेवर मंगळवारी तातडीने सुनावणी सुनिश्चित केली. प्रभारी मुख्य न्या. घुगे यांची कोलकता उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती म्हणून बढती झाल्यामुळे या याचिकेवर न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, डोंबिवलीत नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्याकडून रुग्णालयातील डॉक्टर यांना मारहाण केल्याचे प्रकरण गेल्या दोन महिन्यांपासून गाजत असताना पालघर शहरातील या घटनेने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

प्रकरण काय
शिवसेनेचे आमदार राजेंद्र गावित यांच्यासह अनेक मान्यवरांनी गोविंदा उत्सवादरम्यान सहभाग नोंदविला होता. शनिवारी सायंकाळी गोविंदा उत्सवात हंडी फोडण्याच्या प्रयत्नात जखमी झालेल्या पथकातील सहकाऱ्यांना या शिवसेनेच्या कार्यालयाच्या बाजूला असलेल्या रिलीफ हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यापैकी एका रुग्णाच्या डोक्याला व मणक्याला दुखापत झाल्याने डॉक्टरांनी सीटी स्कॅनसह पुढील उपचार आवश्यक असल्याचे सांगितले. उपचाराचे शुल्क सुमारे २० हजार रुपये असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. त्यापैकी १० हजार रुपये आयोजकांकडून जमा करण्यात आले; मात्र रुग्णाला सोडण्यावरून आणि सीटी स्कॅनच्या आवश्यकतेवरून वादाला सुरुवात झाली. यानंतर कुंदन संखे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि समर्थक रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर व कर्मचाऱ्यांशी अरेरावी करीत शिवीगाळ केल्याचे प्रशासनाने पोलिसांनी तक्रारीत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com