दोषसिद्ध आरोपीची फाशीची शिक्षा रद्द

दोषसिद्ध आरोपीची फाशीची शिक्षा रद्द
Published on

दोषसिद्ध आरोपीची फाशीची शिक्षा रद्द

२०१६ फिजिओथेरपिस्टवरील बलात्कार आणि हत्या प्रकरण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : १० वर्षांपूर्वी २४ वर्षीय फिजिओथेरपिस्टवर तिच्याच घरात बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावलेल्या देबाशीष धाराची दोषसिद्धी आणि फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने सोमवारी (ता. ७) रद्द केली. तसेच, त्याची सुटका करण्याचे आदेश दिले.

धाराची फाशीची शिक्षा कायम ठेवण्याबाबत सरकारने केलेल्या याचिकेवर निर्णय देताना न्या. भारती डांगरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने निर्णय दिला. कायद्यानुसार, कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने पुष्टी केल्याशिवाय अमलात आणण्यासाठी हे प्रकरण उच्च न्यायालयात आले होते. पश्चिम बंगालचा रहिवासी असलेल्या धाराला सप्टेंबर २०१९ मध्ये सत्र न्यायालयाने हत्या, बलात्कार, अनैसर्गिक लैंगिक कृत्य आणि घरात घुसखोरी या गुन्ह्यांसाठी दोषी ठरवले होते. त्यानंतर ऑक्टोबर २०१९ मध्ये हा गुन्हा ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ असल्याचे नमूद करून न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. धाराने ५ आणि ६ डिसेंबर २०१६ च्या मध्यरात्री फिजिओथेरपिस्ट झोपलेली असताना तिच्या खोलीत शिरकाव केला. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार आणि अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली. पहाटे साडेतीनच्या सुमारास पोटमाळ्यावरील खोलीतून धूर येत असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यावर हा गुन्हा उघडकीस आला. तिच्या वडिलांनी आणि एका शेजाऱ्याने दरवाजा तोडला असता फिजिओथेरेपिस्ट मृतावस्थेत आढळली. तिच्या गळ्याभोवती जीन्सची पँट बांधलेली होती. तिच्या शरीरावर पुस्तके ठेवून ती पेटवून देण्यात आली होती, असेही पोलिसांनी दाखल गुन्ह्यात म्हटले होते.

आरोपीचे वर्तन अंगावर काटा आणणारे!
धाराला फाशीची शिक्षा सुनावताना, मृत तरुणी ही घरात झोपलेली एक निष्पाप आणि असहाय्य तरुणी होती. तथापि, आरोपीने तिच्यावर केलेले अत्याचार आणि त्यानंतर त्याचे वर्तन अंगावर काटा आणणारे, पाशवी होते, असे निरीक्षण सत्र न्यायालयाने नोंदवले होते. मृत तरुणीच्या शरीरावर केलेल्या जखमा अत्यंत क्रूरता दर्शवतात आणि या गुन्ह्याने समाजाच्या सामूहिक सद्सद्विवेकबुद्धीला हादरवून सोडले होते, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले होते. पुढे घटनेनंतर जवळपास दोन महिन्यांनी धाराला पश्चिम बंगालमधील मेदिनीपूर जिल्ह्यातून अटक केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com