

पालिका रुग्णालयांचा ‘कायापालट’
रुग्णसेवा अधिक सक्षम, पारदर्शक आणि नागरिककेंद्रित करण्याचे नियोजन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागातील रुग्णसेवा अधिक सक्षम, पारदर्शक आणि नागरिककेंद्रित करण्यासाठी विविध स्तरांवर व्यापक बदलांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मनुष्यबळाची कमतरता दूर करणे, डॉक्टरांची उपस्थिती सुनिश्चित करणे, जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांची सेवा सुलभ करणे, तक्रारींचे वेळेत निराकरण, रुग्णालयांचे डिजिटलायझेशन, सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) आणि रक्तपेढ्यांचा दर्जा सुधारण्यावर प्रशासनाचा भर आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त (आरोग्य) डॉ. प्राजक्ता वर्मा लवंगारे यांनी दिली.
जुन्या समस्या तात्पुरत्या पद्धतीने सोडविण्याऐवजी प्रत्येक सेवेसाठी निश्चित कार्यपद्धती, कालमर्यादा आणि देखरेख यंत्रणा निर्माण करण्याचे नियोजन आहे. जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांसाठी महसूल विभागाच्या ‘सेतू’ पद्धतीचा अवलंब करून नागरिक सुविधा केंद्रांमार्फत सेवा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. अर्जांची संख्या, प्रलंबित प्रकरणे आणि वॉर्डनिहाय कामगिरीवर डॅशबोर्डद्वारे लक्ष ठेवले जाणार असून, प्रमाणपत्र तयार झाल्यावर एसएमएसद्वारे माहिती देण्याची व्यवस्थाही प्रस्तावित आहे. सरकारी रुग्णालयांच्या अधिष्ठात्यांना जन्म-मृत्यू नोंदणी अधिकारी करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. मंजुरी मिळाल्यास रुग्णालयातच जन्मनोंदणी आणि प्रमाणपत्र देणे शक्य होणार आहे.
‘मार्ग’ तक्रार निवारण प्रणालीचा विस्तार आरोग्य, शिक्षण आणि मालमत्ता कर विभागांत करण्याचे नियोजन असून, वेळेत तक्रार न सुटल्यास ती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आपोआप वर्ग होईल.
महापालिकेच्या सर्व रक्तपेढ्यांना पुढील वर्षभरात एनएबीएल मानांकन मिळवून देण्याचे लक्ष्य आहे. ‘कम्पोनंट ब्लड बँक’ सुविधेबाबतही आढावा घेतला जाणार आहे. औषधे व उपकरणांच्या खरेदी प्रक्रियेचे डिजिटल मॅपिंग करून प्रत्येक टप्प्यावर होणारा विलंब डॅशबोर्डद्वारे तपासला जाणार आहे. रुग्णालयांच्या स्वच्छता व हाउसकीपिंग सेवांचे तृतीय-पक्षाकडून परीक्षण करण्याचेही नियोजन आहे. तसेच, २०२८ पर्यंत महापालिकेच्या ताब्यात येणाऱ्या नवीन रुग्णालयांसाठी खाटा, वैद्यकीय सेवा, मनुष्यबळ आणि साधनसामग्रीचे आगाऊ नियोजन सुरू करण्यात आले आहे.
उपचारखर्चाचा भार कमी करणार
पीपीपी प्रकल्पांमध्ये महापालिका रुग्णांना अधिक सेवा मिळतील, अशा रुग्णकेंद्रित मॉडेलचा विचार आहे. सरकारी आरोग्य योजनांचा प्रभावी वापर करून रुग्णांवरील उपचारखर्चाचा भार कमी करण्याचे उद्दिष्ट आहे.
रिक्त पदे भरणार
रुग्णालयांतील रिक्त पदे भरण्यासाठी भरतीला गती देण्यात येणार असून, विशेषतः सहाय्यक प्राध्यापकांची पदे पुढील सहा महिन्यांत भरण्याचा प्रयत्न आहे. नव्या डॉक्टरांसाठी इंडक्शन व प्रशिक्षण कार्यक्रमही सुरू केले जाणार आहेत. बदलत्या वैद्यकीय तंत्रज्ञानानुसार आरोग्य विभागाचा ‘आकृतिबंध’ नव्याने निश्चित करून तंत्रज्ञ व पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांच्या नव्या पदांचा समावेश केला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.