लोकलच्या वेळापत्रकाचा बोजवारा; मुंबईकर रोजच लेट

लोकलच्या वेळापत्रकाचा बोजवारा; मुंबईकर रोजच लेट
Published on

लोकलच्या वेळापत्रकाचा बोजवारा!
पीक अवरमध्ये फेऱ्या रद्द, विलंबामुळे प्रवास लांबला

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : कार्यालयात पोहोचण्याची वेळ निश्चित असली, तरी मध्य रेल्वेच्या लोकलचे वेळापत्रक मात्र अनिश्चित झाले आहे. सकाळच्या गर्दीच्या वेळेत लोकल उशिराने धावणे, फेऱ्या रद्द होणे आणि दोन गाड्यांमधील अंतर वाढल्याने ठाणे, कल्याण आणि पुढील स्थानकांमधून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांना रोजच मनस्ताप सहन करावा लागत आहे. लोकलच्या विलंबामुळे प्रवासाचा वेळ वाढत असून, त्याचा थेट परिणाम नोकरदारांच्या कार्यालयीन वेळेवर होत आहे.
ठाणे स्थानकावर मंगळवारी सकाळी याचा प्रत्यय आला. सीएसएमटीकडे येणारी सकाळी ९.०८ वाजताची लोकल १२ मिनिटे उशिराने, ९.२० वाजता सुटली. ठाणे ते सीएसएमटी हे अंतर पार करण्यासाठी या लोकलला एक तास ३७ मिनिटे लागली. त्यामुळे नियमित प्रवासाच्या तुलनेत प्रवाशांना मोठा विलंब सहन करावा लागला.
सोमवारीही ठाणे स्थानकातील सकाळच्या वेळापत्रकात अनियमितता होती. ९.०८ वाजताची लोकल रद्द करण्यात आली. तर ९ वाजताची लोकल ९.११ वाजता सुटली. त्यानंतर ९.१६ वाजताची लोकलही ९.२४ वाजता रवाना झाली. एक फेरी रद्द झाल्याने पुढील लोकलमध्ये गर्दी वाढली. परिणामी, ठाण्यानंतरच्या स्थानकांवरही प्रवाशांचा ताण वाढला.

कल्याणकरांचा प्रवासही लांबला
कल्याणहून सकाळी ८.४६ वाजता सुटणाऱ्या लोकललाही नियमित प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागत असल्याची तक्रार आहे. सीएसएमटीला पोहोचण्यासाठी या लोकलला अनेकदा सुमारे दोन तास लागत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे या गाडीने प्रवास करणाऱ्या नोकरदारांना कार्यालयात वेळेत पोहोचणे कठीण होत आहे. वारंवार होणाऱ्या विलंबामुळे संतप्त प्रवाशांनी सीएसएमटी स्थानकात मोटरमनकडे जाब विचारत नाराजी व्यक्त केली.

कामे सुरू; मात्र नियोजनाचा अभाव
फलाटाची लांबी वाढविण्याच्या कामांमुळे लोकलचे वेळापत्रक विस्कळित होत असल्याचे सांगितले जात आहे; मात्र या कामांचा थेट भार प्रवाशांवर पडत असल्याने कामांचे नियोजन आणि वाहतूक व्यवस्थापन यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. कामे सुरू करण्यापूर्वी प्रवासी संघटनांशी चर्चा करून पर्यायी व्यवस्था केली असती, तर प्रवाशांचा त्रास कमी करता आला असता, अशी भूमिका उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाने मांडली आहे. सेवा सुरळीत ठेवण्यासाठी राज्य सरकारकडूनही आवश्यक मदत घेण्याची गरज असल्याचे महासंघाने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com