२० हजार आरोग्य शिबिरांचा ‘श्रीगणेशा’

२० हजार आरोग्य शिबिरांचा ‘श्रीगणेशा’
Published on

२० हजार आरोग्य शिबिरांचा ‘श्रीगणेशा’
गणेशोत्सवात राज्यभर २० लाखांहून अधिक नागरिकांची मोफत तपासणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : गणेशोत्सवाच्या काळात राज्यातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यंदा सुमारे २० हजार आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.
‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये ही शिबिरे घेण्यात येणार असून, सार्वजनिक गणेश मंडळे, स्थानिक स्वराज्य संस्थांसह शासकीय व निमशासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्थांचा त्यात सहभाग राहणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गणेश मंडळांच्या परिसरासह महापालिका, नगरपालिका, नगर पंचायत आणि ग्रामीण भागात आरोग्य तपासणीची शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.
शिबिरांमध्ये हृदयरोग, किडनीविकार, कर्करोग, मधुमेह, संसर्गजन्य आजार, मेंदूचे गंभीर आजार आणि बालरोग यांसह विविध आजारांची प्राथमिक तपासणी केली जाणार आहे. तपासणीदरम्यान आरोग्यविषयक समस्या आढळल्यास संबंधित रुग्णांना पुढील तपासणी किंवा उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टर अथवा रुग्णालयांकडे पाठवण्यात येणार आहे.
या शिबिरांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये, शहरी आरोग्य यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरोग्य यंत्रणा तसेच धर्मादाय रुग्णालयांतील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. पुढील उपचारांची आवश्यकता असलेल्या पात्र रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि इतर संबंधित शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
यंदा सुमारे १० हजार सार्वजनिक गणेश मंडळांच्या सहभागातून २० हजार शिबिरे घेण्याचे आणि २० लाखांहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचे नियोजन आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी नागरिकांनी जवळच्या शिबिरांमध्ये आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

गतवर्षी सात लाख चार हजार ७३ नागरिकांना लाभ
गेल्या वर्षी २८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरदरम्यान झालेल्या उपक्रमात १२ हजार ६५५ आरोग्य शिबिरांमध्ये सात लाख चार हजार ७३ नागरिकांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी १८ हजार ८०० रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले. याच कालावधीत झालेल्या २३६ रक्तदान शिबिरांमध्ये १६ हजार ७९८ जणांनी रक्तदान केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com