

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : रेल्वे, एसटी फुल्ल झालेल्या असतानाच ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर खासगी प्रवासी वाहतूकदारांनी मनमानी कारभार चालवत बसभाड्यात तिप्पट वाढ केली आहे. त्यामुळे गणेशोत्सवात कोकणात आणि राज्यातील अन्य भागांत जाणाऱ्या गणेशभक्तांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे.
मुंबईहून रत्नागिरी, सावंतवाडी, गोव्यापर्यंतच्या वातानुकूलित प्रवासासाठी प्रत्येकी तब्बल ४,२०० रुपये प्रवाशांना मोजावे लागेल.
ऐन सणासुदीत खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून बसभाड्यात वाढ केली जाते. त्यावर सरकारने नियंत्रण ठेवावे, असे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले होते. साधारणपणे एक वर्षापूर्वी या सूचना केल्यानंतरही सरकारकडून त्यावर अद्याप नियंत्रण ठेवता आलेले नाही. १४ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. रेल्वे आणि एसटीकडून गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी जादा गाड्या सोडण्यात आल्या असून, त्याही नेहमीप्रमाणे फुल्ल झाल्या आहेत. त्याचा फायदा घेत खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी कोकणात आणि राज्यातील अन्य भागांत जाणाऱ्या बसचे भाडे भरमसाट वाढवले आहे.
यंदा ५,२०० गाड्या उपलब्ध करून दिल्या. त्याव्यतिरिक्त आणखी ७०० गाड्या वाढविण्यात आल्या आहेत. एसटीमुळे प्रवाशांना दिलासा मिळत आहे. खासगी बसचालकांकडून प्रवाशांची लूट सुरू आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे.
- दीपक चव्हाण, अध्यक्ष, गणेशभक्त कोकण प्रवासी संघटना
एसटीने प्रवास केल्यास अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के आणि महिलांना ५० टक्के तिकीट दरात सवलत मिळते. तसेच कमी दरात सुरक्षित प्रवास एसटीने करता येतो. खासगी वाहतूकदारांनी केलेली लूट टाळली जाते. त्यामुळे प्रवाशांनी एसटीला पसंती द्यावी.
- अभिजित पाटील, विभाग नियंत्रक, मुंबई विभाग
एसटी तिकिटाच्या दीडपट तिकीटदर खासगी वाहतूकदार आकारू शकतात. दरम्यान, जादा भाडे घेण्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यानुसार तपासणी सुरू केली आहे. तपासणीत दोषी आढळणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येईल, असे परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
ग्राफिक्स
खासगी बस दर
रत्नागिरी - ४,२००
चिपळूण - ४,४००
दापोली - २,०००
कणकवली - ३,५००
खेड - २,९९०
सावंतवाडी - ४,४००
एसटी बस दर
रत्नागिरी - ६९०
चिपळूण - ५२०
दापोली - ४५५
कणकवली - ८८५
खेड - ४५५
सावंतवाडी - १,०२५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.