

सुधार समितीत महायुतीत जुंपली
भूखंडाच्या आरक्षण बदलावरून खडाजंगी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : महापालिकेत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीच्या माध्यमातून एकत्र सत्तेत असले, तरी गेल्या काही दिवसांपासून भूखंडांच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. मागील बैठकीतील वादानंतर बुधवारी (ता. ९) पार पडलेल्या सुधार समितीच्या बैठकीत पुन्हा एकदा जोगेश्वरीतील म्हाडा भूखंडाच्या आरक्षण बदलावरून भाजप आणि शिवसेना आमनेसामने आले. या वेळी भाजप नगरसेवकांनी विरोध दर्शवत सभात्याग केला, तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने या सर्व प्रकाराला भाजपची स्टंटबाजी आणि नाटक असल्याचे म्हणत टीका केली.
जोगेश्वरी येथील म्हाडाच्या एका भूखंडावरील ‘आरआर २.१ पुनर्वसन’ हे आरक्षण हटवून सुमारे १,८०२.७५ चौरस मीटर जमीन निवासी क्षेत्रासाठी मोकळी करण्याचा प्रस्ताव सुधार समितीत आला होता. मोकळ्या जागा आणि आरक्षित भूखंड निवासी वापरासाठी देण्यास भाजप नगरसेवकांचा विरोध आहे; मात्र शिंदे गटाच्या अध्यक्षांनी हा प्रस्ताव मंजुरीच्या दिशेने नेल्याने वाद उफाळला. विरोध डावलून प्रस्ताव पुढे नेल्याने संतप्त भाजप नगरसेवकांनी सुधार समितीच्या बैठकीतून थेट बाहेर पडणे पसंत केले. याआधीच्या भूखंडाच्या एका प्रस्तावावरून सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी झाली होती. त्या वेळी सुधार समिती अध्यक्षा संध्या दोशी यांनी भाजपच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करून ‘आमचे प्रस्ताव मंजूर केले तरच तुमचे प्रस्ताव मार्गी लावू देणार,’ असा थेट इशाराच दिला. त्यानंतर आज पुन्हा हाच संघर्ष पेटल्याने महायुतीतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.
‘पालिकेची ही सुधार समिती राहिलेली नसून ‘आरक्षण बदल समिती’ झाली आहे. मुंबईकरांच्या मोकळ्या जागा आणि मैदानांची आरक्षणे तशीच राहावीत, म्हणून आम्ही गेल्या चार महिन्यांपासून ओरडून सांगत आहोत. पण भाजप मुंबईतील जमिनी विकायला निघाली आहे.
- सचिन पडवळ, नगरसेवक, शिवसेना (ठाकरे गट)
भाजपने आज वॉकआऊट करण्याआधी प्रस्ताव पास होऊ दिला आणि नंतर बाहेर पडले. भाजपला हा प्रस्ताव पास करायचा नव्हता तर त्यांनी तो ‘नॉट टेकन’ ठेवायला हवा होता. मुंबईकरांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठीच भाजपची ही नाटके सुरू आहेत. आज जसा सुधार समितीत वॉकआऊट केला तसाच हा विषय मुख्य सभागृहात येईल तेव्हाही भाजपने वॉकआऊट करून दाखवावा.
- अशरफ आझमी, गटनेते, काँग्रेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.