

‘कोस्टल’च्या भूसंपादनाचा मार्ग मोकळा
महापालिकेकडून ६७ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : ‘कोस्टल रोड नॉर्थ’ (सागरी किनारा रस्ता) प्रकल्पाच्या मोठा अडथळा दूर होणार आहे. या प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी महापालिकेने गोरेगाव (पश्चिम) येथील सुमारे १४,३४९ चौरस मीटर जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. या थेट भूसंपादनासाठी महापालिकेकडून ६७ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली असून, हा प्रस्ताव सुधार समिती व सर्वसाधारण सभेच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाच्या ‘सीएम वॉर रूम’मध्ये या प्रकल्पाचा समावेश ‘महत्त्वाचा नागरी वाहतूक प्रकल्प’ म्हणून करण्यात आला आहे. मौजे पहाडी गोरेगाव (पश्चिम) येथील ‘पी/दक्षिण’ प्रभागातील ही जमीन ‘विकास आराखडा २०३४’ नुसार अधिग्रहित केली जात आहे. हा भूखंड कांदळवन (मॅन्ग्रोव्हज), खाडीसदृश भाग, ‘सी.आर.झेड.-१’ आणि धोकादायक क्षेत्र रेषेने बाधित असल्याने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या नियमांनुसार आवश्यक परवानग्या घेऊनच पुढील काम केले जाईल. ऑनलाइन मालमत्तापत्रकानुसार या जमिनीवर मे. लक्ष्मी अस्बेस्टॉस प्रॉडक्ट्स लिमिटेडचे नाव आहे. महापालिकेने सुरुवातीला ‘हस्तांतरणीय विकास हक्क’ (टीडीआर) देऊन ही जागा हस्तांतरित करण्याची विनंती केली होती; मात्र मालकाने टीडीआर नाकारत रोख भरपाईची मागणी केल्याने पालिकेला भूमिसंपादन अधिनियम-२०१३ अंतर्गत कायदेशीर कारवाई करावी लागत आहे. वर्ष २०२६-२७च्या मूल्यांकनानुसार या जमिनीचा दर ८७,८३० रुपये प्रति चौरस मीटर निश्चित करण्यात आला असून, त्यानुसार भूसंपादनासाठी ६७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. नियमानुसार या रकमेपैकी ३० टक्के रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केली जाणार आहे. सुधार समितीने हा प्रस्ताव अखेर मंजूर केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.