हरकतीच्या मुद्द्यांवर प्रशासनाचा ‘कानाडोळा’

हरकतीच्या मुद्द्यांवर प्रशासनाचा ‘कानाडोळा’
Published on

हरकतीच्या मुद्द्यांवर प्रशासनाचा ‘कानाडोळा’
महापालिका स्थायी समितीत सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक
​सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत विविध नागरी समस्यांवर उपस्थित करण्यात येणाऱ्या हरकतीच्या मुद्द्यांना प्रशासनाकडून केराची टोपली दाखवली जात असल्याचे समोर आले आहे. महापालिका प्रशासनाकडून महिनोनमहिने हरकतीच्या मुद्द्यांवर कोणतेही स्पष्टीकरण अथवा उत्तर सादर केले जात नसल्याने बुधवारी (ता. ९) पार पडलेल्या बैठकीत सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार हल्लाबोल केला. सदस्यांच्या या तीव्र संतापानंतर अध्यक्षांनी पुढील बैठकीत सर्व मुद्द्यांवर खुलासा करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
​मुंबईकरांच्या दैनंदिन समस्या आणि महत्त्वाच्या धोरणात्मक बाबींवर स्थायी समिती सदस्य बैठकीत हरकतीचे मुद्दे मांडतात. त्यावर अध्यक्षांकडून ते मुद्दे राखून ठेवत प्रशासनाकडून स्पष्टीकरण मागवले जाते, मात्र प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे या हरकतींच्या अर्जांवर धूळ साचत असल्याची वस्तुस्थिती बैठकीत उघड झाली.
​मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी सांगितले की, पाच महिन्यांपूर्वी उपस्थित केलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर अद्याप उत्तर मिळालेले नाही. जर प्रशासनाकडून उत्तरांची अपेक्षाच नसेल, तर आम्ही हरकतीचे मुद्दे मांडायचे कशासाठी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला, तर काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनीही यावरून प्रशासनावर आगपाखड केली.
सुरक्षा रक्षक भरतीतील घोटाळ्याप्रकरणी काही महिन्यांपूर्वी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला होता. अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी चौकशीचे निर्देश देऊनही प्रशासनाने उत्तर दिलेले नाही. हा मुंबईकरांच्या सुरक्षेशी आणि थेट घोटाळ्याशी निगडित विषय असताना प्रशासनाने अशी चालढकल करणे अत्यंत चुकीचे आहे.
या मुद्द्यावर भाजपचे सभागृह नेते गणेश खणकर, शिवसेना ठाकरे गटाच्‍या नगरसेविका मीनाक्षी पाटणकर, एमआयएमचे जमीर कुरेशी, भाजपच्या शीतल गंभीर, तेजिंदर सिंग तिवाना यांनीही प्रशासनाच्या या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. सदस्यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी घटनेची गंभीर दखल घेत, सदस्यांनी मांडलेल्या सर्व हरकतीच्या मुद्द्यांवर प्रशासनाने पुढील बैठकीत सविस्तर खुलासा सादर करावा, असे निर्देश दिले, ​मात्र अध्यक्षांच्या या कडक निर्देशानंतर तरी महापालिका प्रशासन गांभीर्याने उत्तर सादर करणार की पुन्हा नेहमीप्रमाणे कानाडोळा करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

बैठकीत उपस्थित राहायचे कशासाठी?
अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात आम्ही हरकतीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतरही प्रशासन उत्तर देत नाही आणि ठोस कारवाईही करत नाही. आमचा आवाज ऐकला जात नसेल, तर आम्ही बैठकीत कशासाठी उपस्थित राहायचे, यापुढे प्रशासन ऐकत नसेल, तर बैठकीला हजर राहणार नाही, असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे गटनेते अमेय घोले त्यांनी दिला.

प्रशासन खुलासा देत नाही!
​शिवसेना ठाकरे गटाच्या ज्येष्ठ नगरसेविका श्रद्धा जाधव यांनी हरकतीच्या मुद्द्यांकडे प्रशास तसा होत असलेला कानाडोळा यावर नेमके बोट ठेवले. आम्ही वेळोवेळी जनतेचे प्रश्न हरकतीच्या मुद्द्याद्वारे मांडतो. अध्यक्ष निर्देश देतात, परंतु प्रशासन महिने उलटूनही खुलासा सादर करत नाही, अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com