

गणेशभक्तांच्या कोकण प्रवासासाठी रेल्वेची जय्यत तयारी
विशेष गाड्यांपासून वैद्यकीय सेवांपर्यंत सुविधा; गर्दीवर नियंत्रणासाठी स्थानकनिहाय नियोजन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : गणरायाच्या आगमनासाठी कोकणाकडे रवाना होणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली असतानाच कोकण रेल्वेने प्रवाशांच्या सुविधांसाठी विशेष नियोजन केले आहे. मुंबईसह विविध शहरांतून विशेष गाड्या सोडण्याबरोबरच कोकणातील प्रमुख स्थानकांवर वैद्यकीय मदत, प्रवासी सहाय्यता केंद्रे, तिकीट व्यवस्था आणि गर्दी नियंत्रणाची यंत्रणा उभारण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात मुंबई आणि राज्यातील विविध भागांतून कोकणात मोठ्या प्रमाणावर प्रवासी दाखल होतात. ही वाढती गर्दी लक्षात घेऊन माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर अतिरिक्त व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रवाशांना स्थानकावरच आवश्यक माहिती मिळावी आणि पुढील प्रवासात अडचण येऊ नये, यासाठी रेल यात्री सहाय्यता केंद्रे २४ तास सुरू ठेवण्यात येणार आहेत.
मुंबईसह अनेक शहरांतून विशेष गाड्या
गणेशोत्सवासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या समन्वयातून विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. उधना, विश्वामित्री, वलसाड, वडोदरा, नागपूर, मुंबई सेंट्रल, सीएसएमटी, एलटीटी, वांद्रे टर्मिनस, दिवा आणि पनवेल येथून कोकणातील विविध स्थानकांसाठी विशेष सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ, सावंतवाडी रोड, मडगाव आणि ठोकूरपर्यंत या गाड्या धावतील.
आजारपणात तातडीने उपचार
प्रवासादरम्यान प्रवाशांना आरोग्यविषयक मदत मिळावी यासाठी आठ प्रमुख स्थानकांवर १२ सप्टेंबरपासून प्रथमोपचार केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. चिपळूण आणि रत्नागिरी येथील आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचारी उपलब्ध असतील. रक्तदाब, रक्तशर्करा तपासणी, आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिरांसह रुग्णवाहिकांची सुविधाही ठेवण्यात आली आहे.
तिकिटासाठी स्वतंत्र व्यवस्था
गर्दीच्या काळात तिकीट काढताना होणारी गैरसोय टाळण्यासाठी काही स्थानकांवर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड आणि सावंतवाडी रोड येथे पूर्वमुद्रित यूटीएस तिकिटांची सुविधा असेल. रत्नागिरी, कणकवली आणि कुडाळ येथे एम-यूटीएस सहाय्यक प्रवाशांना मदत करतील.
स्थानकांवर पोलिसांचा बंदोबस्त
गर्दीच्या काळात स्थानकांवरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोवीस तास देखरेख केली जाणार आहे. आरपीएफ आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने गर्दी नियंत्रण आणि सुरक्षा व्यवस्था राबविली जाणार आहे. तिकीट तपासणीसाठीही विशेष मोहीम राबविण्यात येणार असून स्थानकांच्या स्वच्छतेसाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात केले जाणार आहेत.
एसटी बसचीही जोड
रेल्वेने कोकणात पोहोचल्यानंतर गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाशी समन्वय साधण्यात आला आहे. स्थानकांवरून पुढील प्रवासासाठी बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासानंतरच्या टप्प्यातही प्रवाशांना सुविधा मिळणार आहेत.
स्थानकांवर गणेशोत्सवाची रंगत
प्रवाशांच्या स्वागतासाठी काही स्थानकांवर गणेशोत्सवाचे वातावरण निर्माण करण्यात येणार आहे. फुले, पूजा साहित्य, फळे आणि काजू मोदकांचे स्टॉल उभारले जाणार आहेत. स्थानिक कलाकारांना भजन, जाखडी, संगीत, कठपुतळी आणि कराओकेसारखे कार्यक्रम सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रांगोळी, रोषणाई आणि सेल्फी पॉइंटसह मुलांसाठीही विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.