

भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : रस्ते अपघात, आगीच्या दुर्घटना, ॲसिड हल्ले किंवा गंभीर दुखापतींमुळे चेहरा अथवा हात गमावलेल्या रुग्णांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्य सरकारच्या जे. जे. रुग्णालयात लवकरच चेहरा आणि हात प्रत्यारोपणाची सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे. रुग्णालयाच्या प्लॅस्टिक सर्जरी विभागाने या दोन्ही प्रत्यारोपणांसाठी आवश्यक परवानगी मिळविण्याकरिता अर्ज केला आहे.
परवाना मिळाल्यानंतर जे. जे. रुग्णालय हे महाराष्ट्रातील हात आणि चेहरा प्रत्यारोपणाची परवानगी असलेले पहिले सरकारी रुग्णालय ठरणार आहे. यापूर्वी मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयाला हात आणि चेहरा प्रत्यारोपणासाठी परवाना मिळाला आहे. सरकारी रुग्णालयात नियमितपणे अशा अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया सुरू झाल्यास गरजू रुग्णांना मोठा फायदा होणार आहे.
जे. जे. रुग्णालयाच्या प्लॅस्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. चंद्रकांत घरवाडे यांनी सांगितले, की चेहरा आणि हात प्रत्यारोपण या दोन्हींच्या परवान्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्व्हिसेसच्या पथकाने रुग्णालयाची पाहणीही केली आहे. गंभीर विकृती झालेल्या रुग्णांना अधिक चांगले आणि सामान्य जीवन जगता यावे, हा या सुविधेमागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आगीमुळे चेहरा गंभीररीत्या भाजलेले, ॲसिड हल्ल्यात चेहरा विद्रूप झालेले, गोळी लागलेले, प्राण्यांच्या हल्ल्यात चेहऱ्याला गंभीर दुखापत झालेले किंवा मोठ्या अपघातात चेहऱ्याची रचना मोठ्या प्रमाणात खराब झालेल्या रुग्णांना या उपचाराची आवश्यकता भासू शकते. सामान्य प्लॅस्टिक सर्जरीद्वारे चेहऱ्याची कार्यक्षमता आणि स्वरूप पूर्ववत करणे शक्य नसलेल्या निवडक रुग्णांसाठी ही शस्त्रक्रिया केली जाते.
चेहरा प्रत्यारोपणाची गरज कोणाला
चेहरा प्रत्यारोपण ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आहे. या प्रक्रियेत मृत दात्याकडून मिळालेली चेहऱ्याची त्वचा, स्नायू, नस, रक्तवाहिन्या आणि काही प्रकरणांमध्ये हाडेदेखील रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपित केली जातात.
आत्मविश्वास आणि सामाजिक जीवनात सुधारणा
चेहरा प्रत्यारोपणामुळे रुग्णाच्या चेहऱ्याचे स्वरूप आणि काही महत्त्वाच्या कार्यांमध्ये सुधारणा होऊ शकते. त्यामुळे रुग्णाचा आत्मविश्वास वाढण्यास तसेच सामाजिक जीवनात पुन्हा सक्रिय होण्यास मदत होऊ शकते. त्याचप्रमाणे हात प्रत्यारोपण यशस्वी झाल्यास हात गमावलेल्या व्यक्तीला दैनंदिन जीवनातील अनेक कामे पुन्हा करण्याची क्षमता मिळू शकते. त्यामुळे गंभीर अपघात किंवा दुखापतींमुळे अवयव गमावलेल्या रुग्णांसाठी जे. जे. रुग्णालयातील प्रस्तावित सुविधा आशेचा किरण ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.