

बँक कर्मचाऱ्यांचा संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यासाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या आवाहनानुसार शुक्रवारी (ता. ११) झालेल्या देशभरात बँक संप करण्यात आला. या बंदला महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, राज्यातील एक लाखांहून अधिक बँक कर्मचारी आणि अधिकारी संपात सहभागी होते. राज्यातील जवळपास सर्वच बँकांच्या शाखा बंद राहिल्याने बँकिंग व्यवहारांवर परिणाम झाला.
बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारकडून होत असलेल्या दुर्लक्षाचा तसेच एकतर्फी निर्णयांचा निषेध करण्यासाठी हा संप पुकारण्यात आला होता. विशेषतः आठवड्यातील पाच दिवस बँकिंग व्यवस्था लागू करावी आणि नफ्याशी संबंधित प्रोत्साहन योजनेची भेदभावपूर्ण अंमलबजावणी थांबवावी, या प्रमुख मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. या वेळी राज्यातील २५ हून अधिक केंद्रांवर मोर्चे, रॅली आणि निदर्शने करण्यात आली. मुंबईतील आझाद मैदानावर दोन हजारांहून अधिक कर्मचारी व अधिकारी एकत्र आले. या वेळी प्रलंबित मागण्यांची तातडीने पूर्तता करावी, न्याय्य व समान वागणूक द्यावी, अशा घोषणा देण्यात आल्या. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सचे महाराष्ट्राचे निमंत्रक कॉ. एन. शंकर यांनी मागण्या मान्य होईपर्यंत संघटित लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.