

गणेशोत्सवाच्या सुट्टीला
काही शाळांचा नकार
शिक्षण विभागाचे कारवाईचे संकेत
मुंबई, ता. १२ : गणेशोत्सवानिमित्त राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांना शालेय शिक्षण विभागाने आठवडाभराची सुट्टी जाहीर केली आहे. मुंबईतील काही शाळांनी ही सुट्टी देण्यास नकार दिला आहे. विलेपार्ले, कांदिवली, घाटकोपर यांसह शहरातील काही भागांतील गुजराती अल्पसंख्याक, कॉन्व्हेंट तसेच आंतरराष्ट्रीय मंडळांशी संबंधित शाळांचा यात समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्रात गणेशोत्सवाला विशेष महत्त्व असून मुंबई, पुणे आणि कोकण परिसरात हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. विद्यार्थ्यांना आणि पालकांना उत्सवात सहभागी होता यावे, तसेच स्थानिक परिस्थितीचा विचार करून शालेय शिक्षण विभाग या कालावधीत शाळांना सुट्टी जाहीर करते; मात्र मुंबईतील काही शाळांनी शासनाच्या सुट्टीच्या निर्णयाची अंमलबजावणी न करता नियमित वर्ग सुरू ठेवल्याची तक्रार शिक्षण विभागाकडे प्राप्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून संबंधित शाळांची माहिती घेतली जाणार आहे. शासन निर्देशांचे पालन झाले आहे की नाही, याची तपासणी करण्यात येणार आहे. शाळांनी कोणत्या कारणास्तव सुट्टी नाकारली, त्यांना संबंधित मंडळ किंवा व्यवस्थापनाकडून विशेष परवानगी आहे का, तसेच शासनाच्या आदेशाचा भंग झाला आहे का, याची पडताळणी केली जाणार आहे. निर्देशांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधित शाळांविरोधात नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.