एसटीच्या ताफ्यात लवकरच ५,००० बस

एसटीच्या ताफ्यात लवकरच ५,००० बस
Published on

एसटीच्या ताफ्यात लवकरच ५,००० बस
‘लाल परी’ खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण
मुंबई, ता. १३ : एसटी महामंडळाने आपल्या बस ताफ्याच्या विस्तारासोबतच आधुनिकीकरणाला वेग दिला आहे. नव्या बसच्या माध्यमातून एसटीची सेवा अधिक सक्षम करण्याचा संकल्प करण्यात आला असून, त्याच दिशेने ५,००० ‘लाल परी’च्या खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे, अशी माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

निविदा प्रक्रियेत सर्वांत कमी दराचा देकार टाटा मोटर्ससारख्या नामांकित आणि विश्वासार्ह संस्थेने सादर केला आहे. त्यामुळे बसच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. सरनाईक म्हणाले, ‘‘नव्या ५,००० बस एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर ग्रामीण महाराष्ट्राची ‘लोकवाहिनी’ असलेल्या एसटीला मोठी बळकटी मिळणार आहे. नव्या बसमुळे जुन्या बसवरील ताण कमी होईल, बसफेऱ्यांची उपलब्धता वाढविणे शक्य होईल आणि प्रवाशांना अधिक चांगली सेवा देता येईल. जुन्या व गळक्या बसेस तसेच प्रवासादरम्यान बस बंद पडण्याच्या समस्येवरही नव्या ताफ्यामुळे प्रभावीपणे मात करता येणार आहे.’’ पुढील सहा महिन्यांत सुमारे ५,००० हून अधिक बस सेवेतून कालबाह्य होऊन भंगारात जाणार आहेत. सध्या महामंडळाला नाइलाजास्तव १२ ते १४ वर्षे जुन्या झालेल्या बसची दुरुस्ती करून त्यांचा प्रवासी सेवेसाठी वापर करावा लागत आहे. या बस सातत्याने रस्त्यात नादुरुस्त होत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. चालकांनाही अशा जुन्या बस चालविताना मोठी कसरत करावी लागते. या सर्व समस्यांना लवकरच पूर्णविराम मिळणार आहे.

आधुनिकीकरणाला सुरुवात
एसटी महामंडळाने यापूर्वीच बस ताफ्याच्या आधुनिकीकरणाला सुरुवात केली आहे. २ बाय २ आसन व्यवस्थेच्या २,६४० ‘लाल परी’ ताफ्यात दाखल झाल्या आहेत. त्याचबरोबर ३ बाय २ आसन व्यवस्थेच्या ३,००० ‘राजमाता जिजाऊ’ बस ताफ्यात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नव्या बसच्या समावेशामुळे एसटीचा ताफा अधिक तरुण, सक्षम आणि प्रवाशांच्या गरजांशी सुसंगत होत आहे.

मागेल त्याला बस
सध्या एसटीकडे बसची कमतरता असल्याने अनेक शालेय फेऱ्या अचानक रद्द करणे, ग्रामीण भागातील मुक्कामी बस उपलब्ध न होणे, अशा कटू प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. नव्या ५,००० बस ताफ्यात दाखल झाल्यानंतर ‘मागेल त्याला बसफेरी’ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. बसफेरीचा फायदा झाला नाही तरी चालेल; मात्र बसफेरीची मागणी करणाऱ्यांनी ती फेरी तोट्यात चालणार नाही याची हमी घ्यावी, असे आवाहन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
==
पर्यावरणपूरक ई-बस
५,००० ‘लाल परी’चा हा टप्पा एसटीच्या पारंपरिक डिझेल बसच्या युगातील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. यानंतर पर्यावरणपूरक ई-बसच्या दिशेने एसटी महामंडळाचा प्रवास अधिक वेगाने सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आधुनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देतानाच पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com