

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : बाळाला स्तनपान करण्यासाठी प्रवासात जागा शोधण्याची वेळ आता एसटीने थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील १२५ एसटी बस स्थानकांवर स्तनदा मातांसाठी स्वतंत्र, सुरक्षित आणि खासगी ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यात येणार आहेत. टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडच्या सीएसआर निधीतून हा उपक्रम राबविण्यात येणार असून, त्यासाठी एसटी महामंडळासोबत सामंजस्य करार करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या करारावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि परिवहनमंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते. एसटीने पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर स्तनदा मातांसाठी अशा स्वतंत्र सुविधेची आखणी केली आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासात बाळासह जाणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.
तीन वर्षांत १२५ कक्ष
सुमारे तीन बाय तीन मीटर आकाराचे हे कक्ष प्री-फॅब्रिकेटेड स्वरूपाचे असतील. त्यामध्ये आवश्यक फर्निचर, विद्युतीकरण आणि इलेक्ट्रॉनिक साहित्याची सुविधा असेल. २०२६-२७ मध्ये ५०, २०२७-२८ मध्ये ५० आणि २०२८-२९ मध्ये २५ कक्ष उभारण्याचे नियोजन आहे. स्थानिक गरजेनुसार संख्येत बदल करण्याची तरतूदही करण्यात आली आहे.
एसटीचा खर्च नाही
कक्षांसाठी एसटी महामंडळ जागा, वीज, पाणी आणि आवश्यक परवानग्यांसाठी सहकार्य करणार आहे, मात्र कक्ष उभारणीसाठी एसटीकडून कोणतेही आर्थिक योगदान दिले जाणार नाही. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्यांची सुरक्षा, देखभाल आणि संचालनाची जबाबदारी एसटीची राहणार आहे.
मातृत्वाचा सन्मान
‘हिरकणी कक्ष’ हा केवळ सुविधा प्रकल्प नसून महिला प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन उचललेले संवेदनशील पाऊल आहे. एसटीच्या बस स्थानकांवर मातृत्वाला खासगी आणि सुरक्षित जागा मिळणार असल्याने महिला प्रवाशांच्या प्रवासात सन्मानाची भर पडणार आहे, असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.