

गणेशोत्सवातून हजारो हातांना काम
मूर्तीपासून डिजिटल सेवेपर्यंत रोजगाराच्या संधी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ ः गणेशोत्सव काळात मुंबईच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा हातभार लागत असून, गणेशमूर्ती तयार करण्यापासून ते मंडप उभारणी, विद्युत सजावट, डेकोरेशन, फुलांची विक्री, प्रसाद, वाहतूक आणि सुरक्षेपर्यंत विविध क्षेत्रांमध्ये हजारो कामगार आणि छोटे व्यावसायिक यांच्या हजारो हातांना रोजगार उपलब्ध होतो. हातावर पोट असलेला कुटुंबांना या दिवसांत रोजगार शोधावा लागत नाही.
मूर्तीपासून मंडपापर्यंत रोजगाराची साखळी
गणेशोत्सवाची सुरुवात मूर्तिकारांच्या कामापासून होते. अनेक महिन्यांपासून मूर्ती तयार करण्याचे काम सुरू असते. मूर्तिकारांसोबत रंगकाम करणारे, कारागीर, वाहतूक करणारे आणि मूर्ती उचलणारे कामगार यांनाही या व्यवसायातून रोजगार मिळतो. सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपांमुळे सुतार, लोहार, वेल्डिंग कामगार, कापड व सजावट करणारे कर्मचारी, इलेक्ट्रिशियन आणि विविध प्रकारचे तंत्रज्ञ यांची मागणी वाढते. काही मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्युत रोषणाई आणि डिजिटल स्क्रीनचा वापर होत असल्याने संबंधित व्यवसायांनाही उत्सवकाळात अतिरिक्त काम मिळत असल्याचे दिसून येत आहे.
फुलांपासून प्रसादापर्यंत बाजारपेठ गजबजली
गणेशोत्सवात फुले, हार, दुर्वा, नारळ, फळे आणि पूजेचे साहित्य यांची मागणी वाढते. मुंबईतील फुलविक्रेते, किरकोळ दुकानदार आणि घाऊक व्यापाऱ्यांच्या व्यवसायाला या काळात मोठी मागणी असते. मोठ्या गणेश मंडळांकडून भाविकांना प्रसाद, पाणी किंवा अन्नदान केले जाते. त्यामुळे खाद्यपदार्थ, पॅकेजिंग, पाणीपुरवठा आणि संबंधित सेवा देणाऱ्या छोट्या व्यावसायिकांचीही उलाढाल वाढते. मंडळाने केलेला प्रत्येक खर्च एका व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही. त्यातून अनेक छोट्या व्यवसायांना आणि कामगारांना उत्पन्न मिळते. त्यामुळे गणेशोत्सव हा स्थानिक अर्थव्यवस्थेलक हातभार लावत असल्याचे दिसून येते.
डिजिटल व्यवसायात मोठी गुंतवणूक
गणेशोत्सवाचा आर्थिक व्यवहार आता सोशल मीडिया प्रचार, ऑनलाइन दर्शन, डिजिटल स्क्रीन आणि लाइव्ह स्ट्रीमिंगमुळे डिजिटल सेवा देणाऱ्या तरुणांनाही काम मिळत आहे. डिजिटल व्यवसायासाठी मोठी गुंतवणूक होत असल्याचे उत्सव काळात दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.