लोकल प्रवाशांना आता ‘मेडिकल कवच’ - मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष; निविदा प्रक्रिया सुरू

लोकल प्रवाशांना आता ‘मेडिकल कवच’  - मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष; निविदा प्रक्रिया सुरू
Published on

लोकल प्रवाशांना आता ‘मेडिकल कवच’
मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष; निविदा प्रक्रिया सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : लोकलच्या गर्दीत अपघात झाला आणि प्रवासी जखमी झाला, तर त्याला तातडीने उपचार मिळणे अत्यावश्यक असते. ही गरज लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई उपनगरी मार्गावरील ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू करण्याची तयारी केली आहे. या कक्षांसाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली असून, ती पूर्ण झाल्यानंतर स्थानकांवर वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे अपघातग्रस्त प्रवाशांना ‘गोल्डन अव्हर’मध्ये उपचार मिळण्यास मदत होणार आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरी विभागात सध्या १२ आपत्कालीन वैद्यकीय कक्ष कार्यरत आहेत. कल्याण, भायखळा आणि वाशी येथील तीन कक्षांची जबाबदारी वैद्यकीय विभागाकडे आहे. या तिन्ही केंद्रांचे व्यवस्थापन १ ऑगस्ट २०२२ पासून ‘अ‍ॅनी फाउंडेशन, ठाणे’ या संस्थेकडे आहे. संस्थेचा करार ३१ जुलै २०२७ पर्यंत आहे. कर्जत, कुर्ला, टिटवाळा, लोकमान्य टिळक टर्मिनस, घाटकोपर, ठाणे, भांडुप, कांजूरमार्ग आणि डोंबिवली येथील नऊ कक्षांचे व्यवस्थापन वाणिज्य विभागाकडे आहे.

प्राथमिक उपचार करता येणार
उपनगरी रेल्वेवरील वाढती गर्दी लक्षात घेऊन वैद्यकीय सुविधांचे जाळे विस्तारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या कक्षांसाठी वाणिज्य विभागाकडून निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित ४३ स्थानकांवर कक्ष सुरू केले जातील. अपघातानंतर रुग्णवाहिका किंवा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी स्थानकावरच प्राथमिक उपचार सुरू करता येणार असल्याने उपचारासाठी लागणारा वेळ कमी होण्यास मदत होईल.

चेंबूर, मानखुर्द, खोपोलीतही सुविधा
चेंबूर आणि मानखुर्द येथील वैद्यकीय कक्षांसाठी औषध परवान्याशी संबंधित प्रक्रिया सुरू आहे. खोपोली येथील कक्षासाठी पावसाळ्यानंतरचे बांधकाम रेल्वेकडून करण्यात येत आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर या तीन स्थानकांवरही आपत्कालीन वैद्यकीय सुविधा सुरू होणार आहेत.

२००९च्या सूचनेला मिळणार विस्तार
अपघातग्रस्त प्रवाशांना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने २००९मध्ये स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उपलब्ध करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाला दिल्या होत्या. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरारदरम्यानच्या ३२ स्थानकांपैकी २२ ठिकाणी वैद्यकीय कक्ष कार्यरत आहेत. मध्य रेल्वेने आता ४३ नव्या कक्षांच्या माध्यमातून ही सुविधा आणखी स्थानकांपर्यंत पोहोचविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
......

मुंबई उपनगरी रेल्वेवरील अपघाती मृत्यू
वर्ष - मध्य रेल्वे - पश्चिम रेल्वे - एकूण
२०२५ - १,४५७ - ८३० - २,२८७
२०२४ - १,५३३ - ९३५ - २,४६८
२०२३ - १,६५० - ९४० - २,५९०
२०२२ - १,५८५ - ९२२ - २,५०७
...
मुंबई उपनगरी रेल्वेवरील अपघाती जखमी
वर्ष - मध्य रेल्वे - पश्चिम रेल्वे - एकूण
२०२५ - १,५६५ - ९८९ - २,५५४
२०२४ - १,६५५ - १,०४२ - २,६९७
२०२३ - १,४६६ - ९७५ - २,४४१
२०२२ -१,१५३ - १,००२- २,१५५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com