

झाडांच्या सुरक्षेसाठी तज्ज्ञांचा शोध
वृक्ष प्राधिकरणातील नामनिर्देशित सदस्यांसाठी पालिकेकडून अर्ज
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : यंदाच्या पावसाळ्यात मुंबईत झाडे आणि फांद्या कोसळून झालेल्या प्राणघातक अपघातांत जीवित व वित्तहानी झाल्याच्या गंभीर घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर तज्ज्ञ सदस्यांच्या नियुक्त्याच झाल्या नसल्याची बाब समोर आल्यानंतर महापालिकेचा उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरणावर चौफेर टीका झाली होती. या तीव्र टीकेनंतर अखेर झोपलेल्या उद्यान विभागाला जाग आली असून, वृक्ष प्राधिकरणावर नामनिर्देशित तज्ज्ञ सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी अधिकृत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पावसाळ्यातील प्राणघातक दुर्घटनांनंतर महापालिकेच्या कारभारावर आणि निष्काळजीवर नागरिकांसह पर्यावरणप्रेमींनी जोरदार निशाणा साधला होता. झाडांची छाटणी, तपासणी आणि संवर्धन करण्यासाठी प्राधिकरणात अभ्यासक व तज्ज्ञ असणे कायदेशीररीत्या आवश्यक असतानाही या जागा रिक्त ठेवण्यात आल्या होत्या.
तज्ज्ञांसाठीच्या प्रमुख अटी व अर्हता निश्चित करण्यात आली असून कृषी, वनस्पतीशास्त्र, पर्यावरणशास्त्र, उद्यानविद्याशास्त्र, वृक्षशास्त्र, वनशास्त्र किंवा तत्सम क्षेत्रातील पदविका, पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असावे. वृक्षलागवड, जतन व संरक्षणाचा किंवा किमान १० वर्षांचा अनुभव बंधनकारक आहे. तसेच उमेदवार मुंबई महापालिकेच्या हद्दीतील रहिवासी असावा. राज्य शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाकडे नोंदणीकृत अशासकीय संस्थांचे (एनजीओ) सक्रिय सदस्य किंवा निवृत्त शासकीय अधिकारी यांनाही अर्ज करता येईल.
प्राधान्य: पर्यावरण क्षेत्रात कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांमध्ये महिला उमेदवारांना विशेष प्राधान्य दिले जाईल.
इच्छुक उमेदवारांनी संपूर्ण नाव, पत्ता, शैक्षणिक अर्हता, अनुभवाचा तपशील आणि आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतींसह अर्ज उद्यान अधीक्षक व वृक्ष अधिकारी यांचे कार्यालय येथे अर्ज सादर करायचे आहेत. नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती उच्च न्यायालयातील पीआयएलच्या अंतिम निर्णयासापेक्ष असेल. तसेच हे नामनिर्देशन तात्पुरत्या स्वरूपाचे असून दरवर्षी नूतनीकरण केले जाईल, असे उद्यान अधीक्षक व वृक्ष अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. उद्यान विभागाच्या या निर्णयामुळे आता तरी मुंबईतील वृक्ष संवर्धन आणि सुरक्षेचा प्रश्न खऱ्या अर्थाने मार्गी लागेल का, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
१९ ऑक्टोबरपर्यंत मुदत
महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ (२४ जानेवारी २०२५ पर्यंत सुधारित)मधील कलम ३(३) अन्वये ही नियुक्ती केली जाणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज सर्व आवश्यक प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतींसह जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत, म्हणजेच १९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत सादर करावी लागणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.