

बीड-पुणे रेल्वे धावली; मुंबईचा प्रवासही सुकर
शिक्षण, रोजगार, उपचार आणि व्यापारासाठी नवी कनेक्टिव्हिटी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : बीड जिल्ह्याच्या रेल्वे संपर्कात गुरुवारी महत्त्वाची भर पडली. अहिल्यानगर-बीड नव्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर बीड-पुणेदरम्यान पहिली दैनंदिन रेल्वे सेवा सुरू झाली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते उद्घाटन विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. ही सेवा पुढे गाडी क्रमांक ११४३३/११४३४ पुणे-बीड-पुणे दैनिक एक्स्प्रेस म्हणून नियमित धावणार आहे. त्यामुळे बीडला पुण्याशी थेट दैनंदिन रेल्वे जोडणी मिळाली असून, पुणेमार्गे मुंबईसह अन्य शहरांकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठीही नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.
पुणे हे शिक्षण, रोजगार, वैद्यकीय उपचार आणि व्यवसायासाठी बीडमधील नागरिकांचे महत्त्वाचे केंद्र आहे. आतापर्यंत या प्रवासासाठी एसटी आणि खासगी बसवर अवलंबून राहावे लागत होते. बीड-पुणे रस्ते अंतर सुमारे २४५ किलोमीटर असून, प्रवासाला साधारण सात तास लागतात. नव्या रेल्वेमुळे विद्यार्थी, नोकरदार, रुग्ण, व्यापारी तसेच पुण्यातील विविध कामांसाठी ये-जा करणाऱ्या प्रवाशांना नियमित रेल्वेचा पर्याय मिळणार आहे.
बसच्या तुलनेत खर्चातही फरक
एसटी बसचे भाडे बसच्या प्रकारानुसार सुमारे ४५० रुपयांपासून सुरू होते. खासगी बससाठी ६०० ते १,२०० रुपये मोजावे लागतात. रेल्वे मार्गाचे अंतर सुमारे ३२० किलोमीटर आहे. मात्र, विविध श्रेणींमुळे प्रवाशांना त्यांच्या गरजेनुसार प्रवासाचा पर्याय मिळणार आहे. सामान्य श्रेणीचे भाडे सुमारे १४० रुपये, द्वितीय आसनाचे १५० ते २०० रुपये आणि शयनयानाचे सुमारे २३० रुपये असण्याची अपेक्षा आहे. वातानुकूलित तृतीय श्रेणीचे भाडे ६०० ते ८०० रुपये असण्याची शक्यता आहे.
पुणेमार्गे मुंबईशी जोडणी
पुणे जंक्शनमार्गे बीडमधील प्रवाशांना मुंबईसह देशातील अन्य शहरांकडे पुढील रेल्वे प्रवास करता येणार आहे. त्यामुळे ही सेवा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी महत्त्वाची कडी ठरणार आहे. व्यापार, कृषी उत्पादनांची वाहतूक आणि धार्मिक पर्यटनालाही या रेल्वे जोडणीचा फायदा होण्याची शक्यता आहे. बीड, अंबाजोगाई आणि परळी वैजनाथ परिसरातील धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या भाविकांसाठीही रेल्वे संपर्क उपयुक्त ठरणार आहे.
उद्घाटन विशेषला सात स्थानकांवर थांबे
गाडी क्रमांक ०१४०१ उद्घाटन विशेष रेल्वेला अमळनेर भांड्याचे, नवीन आष्टी, नारायणडोह, अहिल्यानगर, श्रीगोंदा रोड, दौंड कॉर्ड लाइन आणि उरुळी येथे थांबे देण्यात आले. या गाडीत दोन वातानुकूलित द्वितीय, तीन वातानुकूलित तृतीय, चार शयनयान, चार सामान्य द्वितीय, एक गार्डस् ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन असे एकूण १५ डबे आहेत.
अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पातील अहिल्यानगर-बीड विभाग सुरू झाल्याने बीडला प्रथमच महाराष्ट्राच्या मुख्य प्रवासी रेल्वे जाळ्याशी थेट जोडणी मिळाली आहे. त्यामुळे पुणे आणि त्यापुढील शहरांचा प्रवास करण्यासाठी बीडच्या प्रवाशांसमोर रेल्वेचा नवा मार्ग खुला झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.