

मोगरा नाल्यात कचरा
टाकणाऱ्यांवर गुन्हा
सात दिवसांत सुका कचरा केंद्रांची चौकशी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : अंधेरी पश्चिमेतील लोखंडवाला बॅक रोडवरील मोगरा नाल्यात वाहनातून सुका कचरा फेकल्याच्या धक्कादायक घटनेनंतर महापालिकेने कठोर भूमिका घेतली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओची तत्काळ दखल घेऊन महापालिका प्रशासनाने याप्रकरणी ओशिवरा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. याशिवाय मुंबईतील सर्व सुका कचरा संकलन आणि विलगीकरण केंद्रांची सात दिवसांच्या आत झाडाझडती घेण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
१४ सप्टेंबरला सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. यात एका वाहनातून उघडपणे मोगरा नाल्यात सुका कचरा टाकला जात असल्याचे स्पष्ट दिसत होते. महापालिकेच्या प्राथमिक तपासात हे वाहन ‘के/पश्चिम’ वॉर्डमधील ‘आकार मुंबई’ या संस्थेद्वारे चालवल्या जाणाऱ्या सुका कचरा केंद्राशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पालिकेने १५ सप्टेंबरला संबंधित केंद्रचालकाला कारणे दाखवा नोटीस बजावून ४८ तासांत स्पष्टीकरण मागवले होते. अखेर वाहन कंत्राटदार आणि दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करून आज (ता. १७) ओशिवरा पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदवून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पालिका अधिकारीही रडारवर
- महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या आदेशानुसार सहाय्यक अभियंते आणि वॉर्ड अधिकाऱ्यांचे संयुक्त पथक पुढील सात दिवसांत मुंबईतील सर्व सुका कचरा केंद्रांची चौकशी करणार आहे.
- संस्थांचे कार्यादेश, वाहनांचा तपशील व चालकांची माहिती घेतली जाणार आहे. वाहनांतील जीपीएस प्रणाली, कचरा आवक-जावक नोंदी, पुनर्प्रक्रियेच्या पावत्या आणि केंद्रांतील ९० दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहेत.
- एखादे वाहन परवानगीशिवाय निश्चित मार्गावरून भरकटल्याचे दिसल्यास चौकशी केली जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेत निष्काळजी दाखवणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवरही थेट कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे.
.............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.