वांद्रे टर्मिनसवर ३,७०० प्रवाशांसाठी होल्डिंग एरिया

वांद्रे टर्मिनसवर ३,७०० प्रवाशांसाठी होल्डिंग एरिया
Published on

वांद्रे टर्मिनसवर ३,७०० प्रवाशांसाठी होल्डिंग एरिया
दिवाळीपूर्वी प्रवासी सुविधा केंद्र सुरू करण्याचे नियोजन; १६.४३ कोटींचा खर्च

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : सणासुदीच्या काळात वांद्रे टर्मिनसवर होणारी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी ३,७०० प्रवाशांना सामावून घेणारे नवे होल्डिंग एरिया उभारण्यात येत आहे. १६.४३ कोटी रुपये खर्चाच्या या प्रवासी सुविधा केंद्राचे काम रेल भूमि विकास प्राधिकरणामार्फत (आरएलडीए) सुरू असून, दिवाळीपूर्वी ते प्रवाशांसाठी खुले करण्याचे नियोजन आहे.
एकूण २,६२५ चौरस मीटर क्षेत्रात हे केंद्र उभारले जात आहे. त्यापैकी १,३४५ चौरस मीटर क्षेत्र तिकीट काढण्यापूर्वी प्रवाशांच्या प्रतीक्षेसाठी राखीव असेल. या ठिकाणी ४५ तीन आसनी बाके, पाच प्रवासी माहिती फलक, वॉटर कूलर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि स्वच्छतागृहे असतील.
२८५ चौरस मीटरच्या तिकीट विभागात आठ अनारक्षित तिकीट काउंटर, १० कार्यस्थळे आणि सहा स्वयंचलित तिकीट विक्री यंत्रे बसवण्यात येणार आहेत. तिकीट काढल्यानंतरच्या ९९५ चौरस मीटर क्षेत्रात दोन सामान तपासणी यंत्रे आणि बाहेर पडण्यासाठी रॅम्पची सुविधा असेल.

प्रवाशांचे गट करून प्लॅटफॉर्मकडे प्रवेश
गर्दीचे नियोजन करण्यासाठी प्रवाशांना वेगवेगळ्या गटांत विभागून त्यांना प्लॅटफॉर्मकडे सोडले जाणार आहे. अनधिकृत वाहनांना परिसरात प्रवेश रोखण्यासाठी बोलार्ड, दिशादर्शक फलक, परावर्तित दिवे आणि वाहतूक मार्शलची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे गर्दीच्या काळात प्रवाशांचा प्लॅटफॉर्मकडे जाणारा प्रवाह नियंत्रित करणे शक्य होणार आहे.

२०२४ मधील दुर्घटनेनंतर उपाययोजना
ऑक्टोबर २०२४ मध्ये गोरखपूरला जाणाऱ्या रेल्वे गाडीत चढताना वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरीची घटना घडली होती. त्यात १० प्रवासी जखमी झाले होते. या घटनेनंतर रेल्वेकडून गर्दी नियंत्रणासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. सध्या स्थानकावर सुमारे ६०० प्रवाशांची क्षमता असलेले प्रतीक्षालय आहे; मात्र दररोज सुमारे ४० हजार प्रवाशांची ये-जा आणि २२ लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचे संचालन होत असल्याने अतिरिक्त प्रतीक्षा क्षेत्राची गरज निर्माण झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com