गणेशभक्तांना दिलासा; रविवारी दिवसा लोकलला मेगा ब्लॉक नाही

गणेशभक्तांना दिलासा; रविवारी दिवसा लोकलला मेगा ब्लॉक नाही
Published on

गणपती दर्शनाला मेगाब्लॉकचे विघ्न नाही
मध्य रेल्वेवर ठाणे-कल्याणदरम्यानच चार तासांचा खोळंबा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : गणेशोत्सवात रविवारची सुट्टी आल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपती दर्शनासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने घराबाहेर पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर मध्य आणि पश्चिम रेल्वेने प्रवाशांना दिलासा दिला आहे. मध्य रेल्वेवर ठाणे-कल्याणदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत ब्लॉक घेतला जाणार असला, तरी मेन, हार्बर, ट्रान्स-हार्बर आणि बेलापूर-उरण पोर्ट मार्गावर मेगाब्लॉक नसेल. पश्चिम रेल्वेवरही रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक नसल्याने गणपती दर्शनासाठी प्रवास करणाऱ्या भाविकांना लोकल सेवांमध्ये मोठा अडथळा येणार नाही.

ठाणे-कल्याणदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर अभियांत्रिकी व देखभालीची विविध कामे करण्यात येणार आहेत. या काळात काही मेल-एक्स्प्रेस गाड्या ठाणे-कल्याणदरम्यान जलद मार्गावरून वळविण्यात येतील. त्यामुळे संबंधित गाड्यांना नियोजित वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटांचा विलंब होण्याची शक्यता आहे.

वसई-दिवा मेमू सेवेत बदल
ब्लॉकमुळे वसई रोड-दिवा मेमू सेवेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. वसई रोडहून सकाळी ९.५० वाजता सुटणारी ६१००३ मेमू कोपर स्थानकातच थांबविण्यात येईल. तर दिवा-वसई रोड ६१००४ मेमू दिवा स्थानकाऐवजी कोपर येथून सकाळी ११.४५ वाजता सुटेल. त्यामुळे दिवा-कोपरदरम्यान मेमू सेवा रद्द राहणार आहे.

पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री जम्बो ब्लॉक
पश्चिम रेल्वेवर शनिवार-रविवारच्या मध्यरात्री म्हणजेच १९ आणि २० सप्टेंबरदरम्यान सांताक्रूझ-माहीम स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक घेतला जाणार आहे. अप जलद मार्गावर मध्यरात्री १२ ते पहाटे ४ आणि डाऊन जलद मार्गावर मध्यरात्री १२.३० ते पहाटे ४.३० या वेळेत ब्लॉक असेल. या काळात अंधेरी ते चर्चगेटदरम्यान सर्व जलद लोकल धीम्या मार्गावरून चालविण्यात येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com