

‘एल अँड टी’चा ऑस्ट्रेलियात महाप्रकल्प
६४ हजार टनांचे मॉड्यूल; भारतीय अभियांत्रिकीची झेप
मुंबई, ता. १८ : अभियांत्रिकी महाकाय कंपनी लार्सन अँड टूब्रोने असामान्य आणि अद्वितीय असा प्रकल्प पूर्ण करताना एकूण ६४ हजार मेट्रिक टनांचे ११० मॉड्यूल, प्रोजेक्ट सेरेसअंतर्गत ऑस्ट्रेलियाला पुरवली आहे.
एका खासगी कंपनीच्या युरिया उत्पादन प्रकल्पासाठी ही यंत्रसामग्री आणि प्रकल्पाचे मॉड्यूल ऑस्ट्रेलियाला नेण्यात आले. पेडर्मन आणि साइपेम यांनी या कामी लार्सन अँड टूब्रोला सहकार्य केले. कोणत्याही भारतीय कंपनीचा ऑस्ट्रेलियातील हा एवढा मोठा पहिलाच प्रकल्प असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, लार्सन अँड टूब्रोच्या तमिळनाडूतील कुटपल्ली प्रकल्पात हे मॉड्यूल तयार करून ते जहाजांच्या २३ फेऱ्यांद्वारे ऑस्ट्रेलियाला नेण्यात आले व तेथे प्रकल्पाच्या जागेवर त्यांची जोडणी करण्यात आली. लार्सन अँड टूब्रोने यापूर्वी हॉलंडच्या शेल कंपनीला तसेच सिंगापूर, अल्जेरिया, नायजेरिया, थायलंड यांनाही अशी मॉड्यूल पुरवली आहेत, असे कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एस. एन. सुब्रमण्यन यांनी सांगितले. या प्रकल्पाची व कामगिरीची माहिती देण्यासाठी आयोजित विशेष कार्यक्रमास पश्चिम ऑस्ट्रेलियाचे प्रीमियर रॉजर कुक, ऑस्ट्रेलियाचे भारतातील उच्चायुक्त फिलिप ग्रीन, पेडर्मनचे अध्यक्ष विलास रामबाल, लार्सन अँड टूब्रोचे उपमहाव्यवस्थापकीय संचालक सुब्रमण्यम सरमा साईपेमचे फॅब्रिझिओ बोटा आदी मान्यवर हजर होते.
हा प्रकल्प म्हणजे भारत आणि ऑस्ट्रेलिया विशेषतः पश्चिम ऑस्ट्रेलिया यांच्यातील सहकार्याचा सेतू असून यामुळे यापुढेही अशा प्रकल्पांचा मार्ग मोकळा झाला आहे. आम्ही भारताला केवळ बाजारपेठ म्हणून नाही तर औद्योगिक संबंधांचा भागीदार म्हणून बघतो. ऊर्जा क्षेत्राचे संक्रमण, पुरवठा साखळी या सर्वांमध्ये भारतीय उद्योगांना ऑस्ट्रेलियात मोठी संधी आहे. या प्रकल्पामुळे आता आपल्याला अशा संधी वाढवता येतील, असे रॉजर कुक म्हणाले.
कुशल कामगारांची कमतरता
...........
सध्या भारतभर आणि विशेषतः लार्सन अँड टूब्रोलादेखील कुशल कामगारांची हजारोंच्या संख्येत कमतरता जाणवत आहे. साइटवर जाणारे तसेच काँक्रीट बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांची कमतरता आहे, असे अध्यक्ष सुब्रमण्यन म्हणाले. आम्ही विविध मार्गाने ही तूट भरून काढण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहोत, असे सरमा यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.