गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वेच्या २२ विशेष लोकल

गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वेच्या २२ विशेष लोकल
Published on

गणपती विसर्जनासाठी
मध्य रेल्वेच्या २२ विशेष लोकल
मुख्य मार्गावर १८, हार्बरवर चार रात्रीच्या विशेष सेवा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : गणपती विसर्जनासाठी पश्चिम रेल्वेने १२ विशेष लोकलची घोषणा केल्यानंतर आता मध्य रेल्वेनेही भाविकांच्या सोयीसाठी विशेष नियोजन जाहीर केले आहे. गणपती उत्सवाच्या काळात मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर १८, तर हार्बर मार्गावर चार, अशा एकूण २२ विशेष रात्रीच्या उपनगरीय गाड्या चालविण्यात येणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण-ठाणे आणि परतीच्या दिशेने मुख्य मार्गावरील विशेष सेवा २३/२४, २४/२५ आणि २५/२६ सप्टेंबरच्या रात्री धावतील. हार्बर मार्गावर केवळ गणपती विसर्जनाच्या दिवशी, म्हणजेच २५/२६ सप्टेंबरच्या रात्री, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल आणि परतीच्या दिशेने चार विशेष उपनगरीय गाड्या चालविण्यात येतील. या सर्व विशेष गाड्या संबंधित मार्गावरील सर्व स्थानकांवर थांबतील.

मुख्य मार्गावर प्रवाशांची सोय
डाऊन मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कल्याणच्या दिशेने रात्री १.४० आणि ३.२५ वाजता, तर ठाण्याच्या दिशेने २.३० वाजता विशेष लोकल सुटतील. अप मुख्य मार्गावर कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने रात्री १२.०५ वाजता, तर ठाण्याहून १ आणि २ वाजता विशेष लोकल सुटतील. या सहा वेळांच्या सेवा २३/२४, २४/२५ आणि २५/२६ सप्टेंबरच्या रात्री प्रत्येकी धावतील. त्यामुळे मुख्य मार्गावर एकूण १८ विशेष सेवा चालविण्यात येणार आहेत.

हार्बरवरही सुविधा
केवळ २५/२६ सप्टेंबरच्या रात्री हार्बर मार्गावर चार विशेष सेवा चालविण्यात येतील. डाऊन हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून पनवेलच्या दिशेने रात्री १.३० आणि २.४५ वाजता, तर अप हार्बर मार्गावर पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने १ आणि १.४५ वाजता विशेष लोकल सुटतील.

सर्व स्थानकांवर थांबा
मध्य रेल्वेच्या या विशेष गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कल्याण, ठाणे तसेच पनवेलदरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबणार आहेत. गणपती उत्सवाच्या काळात रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या भाविकांना या अतिरिक्त सेवांचा लाभ घेता येणार आहे. प्रवाशांनी गणपती उत्सवासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष उपनगरीय रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com