गणरायासह गौरींना सहाव्या दिवशी निरोप

गणरायासह गौरींना सहाव्या दिवशी निरोप
Published on

डोळ्यांत अश्रू, मुखात गणरायाचा गजर!
गणपतीसह गौरींना भावपूर्ण निरोप

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : अवघ्या काही दिवसांच्या सहवासाने घराघरात आनंदाचे वातावरण निर्माण करणाऱ्या लाडक्या गणरायाला आणि तीन दिवस माहेरी आलेल्या गौरींना आज भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. उत्सवाच्या सहाव्या दिवशी विसर्जनाच्या वेळी भाविकांचा कंठ दाटून आला. मुंबई शहर आणि उपनगरांत सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकूण १,९५१ गणेश व गौरी मूर्तींचे शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात विसर्जन झाले.

दुपारनंतर विविध नैसर्गिक जलस्रोतांसह महापालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावांवर भाविकांची गर्दी झाली. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. गुलाल, फुलांची उधळण आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात आरती ओवाळून भाविकांनी गणरायाला निरोप दिला. तीन दिवस माहेरी पाहुणचार घेतलेल्या गौरीच्या विसर्जनावेळी महिलाही भावुक झाल्या होत्या.

महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, सहाव्या दिवशी घरगुती गणपतींच्या विसर्जनाची संख्या सर्वाधिक होती. एकूण १,६५२ घरगुती गणपतींचे विसर्जन झाले. तसेच २८४ गौरींचे विधिवत विसर्जन करण्यात आले. याशिवाय १५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही गणरायाला निरोप दिला.

पर्यावरणाचे भान राखत अनेक भाविकांनी कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्याला प्राधान्य दिले. महापालिका प्रशासन, पोलिस, अग्निशामक दल आणि जीवरक्षकांनी विसर्जनस्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता. भाविकांचा संयम आणि प्रशासनाच्या नियोजनामुळे सहाव्या दिवसाचा विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडला.

पालघर जिल्ह्यात १,८४९ गणरायांना निरोप
पालघर : जिल्ह्यात गौरी-गणेशोत्सवाची पाचदिवसीय सांगता भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात झाली. जिल्ह्यात ३९७ सार्वजनिक आणि १,४५२ खासगी अशा एकूण १,८४९ गणरायांचे विसर्जन करण्यात आले. गणरायाला निरोप देण्यासाठी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत भाविक मोठ्या संख्येने विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com