मुंबई महापालिकेतील ८०० अभियंत्यांच्या बदल्या

मुंबई महापालिकेतील ८०० अभियंत्यांच्या बदल्या
Published on

मुंबई महापालिकेतील ८०० अभियंत्यांच्या बदल्या
१ ते १५ ऑक्टोबरदरम्यान आदेश जारी होणार; वर्षानुवर्षे ठाण मांडणाऱ्यांची उचलबांगडी
मुंबई, ता. २० : पालिकेत वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या अधिकारी व अभियंत्यांची आता उचलबांगडी होणार आहे. पालिकेच्या पारदर्शक ऑनलाइन बदली प्रक्रियेमुळे प्रशासनात मोठे फेरबदल होणार असून, येत्या महिन्याभरात जवळपास ८०० अभियंत्यांच्या बदल्या होणार आहेत. या प्रक्रियेमुळे नवीन लोकांच्या नियुक्तीला होणारा विरोध मोडून काढला जाणार असून, मानवी हस्तक्षेपाशिवाय संगणकीय प्रणालीद्वारे या बदल्या केल्या जाणार आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
​पालिकेच्या नियमानुसार संबंधित खात्यात किंवा विभागात तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी एकूण कर्मचाऱ्यांच्या २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या दरवर्षी १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत करण्याची तरतूद आहे, मात्र ७ ते १० वर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेले अनेक अभियंते ही ऑनलाइन प्रक्रिया पुढे ढकलण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे समोर आले आहे. नवीन अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगला विरोध होत असल्याने नवीन लोकांनी जायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन ऑनलाइन बदल्यांवर ठाम आहे.

आलेले अर्ज
​सहाय्यक अभियंता ५१
​उपअभियंता २३२
​कनिष्ठ अभियंता २०१

उपलब्ध रिक्त पदे
​सहाय्यक अभियंता (सिव्हिल) १८८
​सहाय्यक अभियंता (मेकॅनिकल) ४८
​उपअभियंता २२५

अर्ज वाढण्याची शक्‍यता
वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की,​ ऑनलाइन प्रणालीच्या सॉफ्टवेअरमध्ये सर्व अभियंत्यांचा वैयक्तिक डेटा आणि रिक्त पदांची माहिती पूर्णपणे फीड करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय व वशिल्याशिवाय संगणकीय पद्धतीद्वारे या बदल्या पूर्ण केल्या जातील. पात्र अभियंत्यांना ५ ते २० सप्टेंबर २०२६ दरम्यान ऑनलाइन अर्ज करून आपल्या पसंतीचे ५ प्राधान्यक्रम नोंदवण्याची सुविधा दिली आहे.
​शुक्रवारी (ता. १८) पर्यंत बदल्यांसाठी एकूण ४९४ अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्जाची मुदत २० सप्टेंबर असून, त्यानंतरच्या पुढील दोन दिवसांत आणखी १०० अर्ज येण्याची शक्यता आहे. या अर्जांनंतर रिक्त पदे भरून एकूण ८०० च्या आसपास बदल्या होण्याचा अंदाज आहे. ​ऑनलाइन अर्जांची छाननी झाल्यानंतर १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत बदल्यांचे अधिकृत आदेश जारी केले जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com