

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : एसटीच्या बस स्थानकांवर अनेक ठिकाणी स्वच्छतेच्या कामाचा बोजवारा उडाला असून, कामात सुधारणा होत नसेल, तर संबंधित संस्थेला केवळ नोटीस बजावून न थांबता विद्यमान स्वच्छता निविदाच रद्द करून नव्याने निविदा काढावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.
एसटीत स्वच्छतेबद्दल वारंवार तक्रारी येत असल्याने बस स्थानकांचा परिसर, कर्मचारी विश्रांतिगृहे, स्थानक स्वच्छतागृहे आणि बसच्या स्वच्छतेसाठी खासगी संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक विभागांमध्ये स्वच्छतेचा अपेक्षित दर्जा राखला जात नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. विशेषतः मोठ्या बस स्थानकांवरील स्वच्छतागृहांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी असतानाही पुरेसे मनुष्यबळ व आवश्यक साधनसामग्री उपलब्ध नसल्याने स्वच्छतेचा प्रश्न गंभीर होत असल्याचे बरगे यांनी निदर्शनास आणून दिले.
नवे कंत्राट देण्यात येऊन त्याला साधारण चार महिने होऊनही स्वच्छतेत सुधारणा झाली नसल्याने व तक्रारी वाढल्याने परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी नाराजी व्यक्त करीत प्रशासनाला स्पष्ट कारवाईचे निर्देश देऊनही संबंधित अधिकारी जबाबदारीने काम करीत नसतील, कंत्राटदाराला पाठीशी घालत असतील, तर अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली पाहिजे. त्याचप्रमाणे स्वच्छतेचे कंत्राट घेतलेल्या संस्थेच्या कामात सुधारणा होत नसेल तर करार रद्द करून पुन्हा एकदा निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणीही बरगे यांनी केली आहे.
स्वच्छता ही प्रवाशांच्या व कर्मचाऱ्याच्या सुविधेपुरती मर्यादित बाब नसून त्यांच्या आरोग्याशी संबंधित अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. हजारो प्रवासी दररोज एसटी स्थानकांवर ये-जा करतात. त्यामुळे कर्मचारी व प्रवासी यांची स्वच्छतागृहे आणि बस स्थानकांचा परिसर चोवीस तास स्वच्छ ठेवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आणि प्रभावी यंत्रणा असणे आवश्यक आहे.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी, काँग्रेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.