जगभरातील ५० देशांत आयसीएआयचे जाळे निर्माण करण्याचे उद्दिष्ट;

जगभरातील ५० देशांत आयसीएआयचे जाळे निर्माण करण्याचे उद्दिष्ट;
Published on

५० देशांत आयसीएआयचे
जाळे निर्माण करण्याचे उद्दिष्ट
राष्ट्रीय परिषदेत अध्यक्ष प्रसन्ना कुमार डी यांची माहिती

संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा
कोची, ता. २० : भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेचे (आयसीएआय) जागतिक स्तरावरील जाळे अधिक विस्तारण्याच्या दिशेने संस्थेने पावले उचलली आहेत. पुढील सहा ते आठ महिन्यांत जगातील ५० देशांमध्ये आयसीएआयची उपस्थिती निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शाखा आणि प्रतिनिधी कार्यालयांची एकत्रित संख्या १००पर्यंत नेण्याच्या दिशेनेही संस्थेची वाटचाल सुरू असल्याची माहिती आयसीएआयचे अध्यक्ष प्रसन्ना कुमार डी यांनी दिली दिली.
सध्या आयसीएआयची सुमारे ४३ देशांमध्ये आपले कार्य सुरू असून, परदेशात ५५ शाखा कार्यरत आहेत. अमेरिकेतील ओहायो येथे अलीकडेच नव्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले असून, ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे पुढील महिन्याच्या सुरुवातीला आणखी एका शाखेची सुरुवात होणार आहे. याशिवाय आणखी दोन शाखा स्थापनेच्या प्रक्रियेत आहेत. दक्षिण अमेरिका खंडात आयसीएआयचा विस्तार करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. भाषेची अडचण हे या विस्तारातील एक आव्हान असल्याने दक्षिण अमेरिकेत स्थायिक होऊ इच्छिणाऱ्या भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्ससाठी स्पॅनिश भाषेचे वर्ग आयोजित केले जात आहेत. दक्षिण अमेरिकेत आयसीएआयचे प्रतिनिधी कार्यालय सुरू करण्याची प्रक्रियाही सुरू असल्याचे सांगण्यात आले.

इंग्रजी भाषिक देशांमध्ये आयसीएआयची आधीपासूनच व्यापक उपस्थिती आहे. युरोपातील काही बिगर-इंग्रजी भाषिक देशांमध्येही संस्थेचे नेटवर्क विस्तारले आहे. अलीकडे आयसीएआयच्या केंद्रीय परिषदेचे काही सदस्य उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या गटाच्या बैठकीसाठी ब्राझीलमध्ये गेले होते. या दौऱ्यात भारतीय दूतावासाशीही संवाद साधण्यात आला. दक्षिण अमेरिकेत भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स विविध क्षेत्रांत कार्यरत असल्याचे निदर्शनास आल्याचे सांगण्यात आले. आयसीएआयचे नेटवर्क केवळ परदेशातच नव्हे, तर देशांतर्गतही विस्तारत आहे. सध्या देशभरात संस्थेच्या ११८ शाखा असून पाच प्रादेशिक कार्यालये कार्यरत आहेत. आणखी एका शाखेची लवकरच सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले.
आयसीएआयमध्ये ५२ समित्यांसह विविध संचालनालये आणि विभाग कार्यरत असून, संस्थेच्या माध्यमातून दररोज विविध स्तरांवर कामकाज सुरू असते. त्यामुळे संस्थेचे कार्यक्षेत्र केवळ चार्टर्ड अकाउंटन्सी व्यवसायापुरते मर्यादित नसून लेखा, लेखापरीक्षण, मानके, शाश्वतता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य अशा विविध क्षेत्रांपर्यंत विस्तारले असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
--
जागतिक मानकांच्या निर्मितीतही सहभाग
लेखा आणि लेखापरीक्षण क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय मानकांच्या निर्मितीत आयसीएआयचा सहभाग वाढत आहे. भारतातील शाश्वतता अहवालांच्या विश्वासार्हतेला आणि एकसंधतेला बळकटी देण्यासाठी द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय)ने एसएसए ५०००-जनरल रिक्युरमेंट्स अँड फॉर्मवर फॉर सस्टेनाबिलिटी अन्शुरन्स एंगेजमेंट हे नवे मानक जारी केले आहे. या माध्यमातून भारतातील सस्टेनाबिलिटी अन्शुरन्स प्रणालीला जागतिक मानकांशी सुसंगत करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

शिस्तभंग प्रकरणांच्या निपटाऱ्याला वेग देणार
चार्टर्ड अकाउंटंट्सविरुद्धच्या शिस्तभंगाच्या प्रकरणांचा जलद निपटारा करण्यावरही आयसीएआयचा भर आहे. प्रकरणांच्या गुणवत्तेवर परिणाम न करता प्रलंबित प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com