

सिग्नल यंत्रणेचे आधुनिकीकरण
सोलापूर विभागासाठी २०९ कोटींची तरतूद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : रेल्वे वाहतुकीची सुरक्षितता आणि क्षमता वाढविण्यासाठी सोलापूर विभागातील सिग्नल यंत्रणेचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. रेल्वे बोर्डाने विभागातील सात प्रमुख स्थानकांवर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली बसविण्यासाठी तब्बल २०९ कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी दिली आहे. या कामामुळे जुन्या सिग्नलिंग यंत्रणेची जागा आधुनिक तंत्रज्ञान घेणार असून, ‘कवच’च्या अंमलबजावणीसह गाड्यांच्या सुरक्षित आणि सुरळीत संचालनाला बळ मिळणार आहे.
हाय डेन्सिटी नेटवर्कवरील मोहोळ, मुंडेवाडी, बाळे, सोलापूर, होतगी जंक्शन, होतगी ए केबिन, शहाबाद आणि वाडी जंक्शन या सात ठिकाणी ही कामे केली जाणार आहेत. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगसोबत ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग आणि केंद्रीकृत वाहतूक नियंत्रण (सीटीसी) यंत्रणाही उभारण्यात येणार आहे. इंटरलॉकिंग ही संगणकावर आधारित आधुनिक प्रणाली आहे. यामध्ये पॉइंट आणि सिग्नल यांच्यातील समन्वय अधिक अचूकपणे साधला जात असल्याने रेल्वे परिचालनातील सुरक्षितता वाढविण्यास मदत होते. यंत्रणेत बिघाड झाल्यास तो तातडीने शोधणे आणि दुरुस्ती करणेही शक्य होते.
पायाभूत सुविधांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड
सोलापूर विभागातील रेल्वे वाहतूक वाढत असताना सिग्नलिंग यंत्रणा सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंगमुळे गाड्यांच्या संचालनाचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होण्यास मदत होईल, तर ‘सीटीसी’मुळे वाहतुकीवर केंद्रीकृत पद्धतीने देखरेख आणि नियंत्रण ठेवता येणार आहे. या तिन्ही प्रणालींसह ‘कवच’च्या अंमलबजावणीला मिळणारे बळ हे या प्रकल्पाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरणार आहे. त्यामुळे सोलापूर विभागातील रेल्वे सुरक्षेच्या पायाभूत सुविधांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.