

मुंबईत वॉटर मेट्रोसाठी जलमार्गांचा होणार विकास
कोची मेट्रोकडून मेरिटाइम बोर्डाकडे ‘डीपीआर’ सादर
नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
कोची, ता. २१ : मुंबईत वॉटर मेट्रो सुरू करण्यापूर्वी जलमार्ग सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे. सुरक्षित नौकानयनासाठी जलमार्गांची खोली, समुद्रतळाची रचना, गाळाचे प्रमाण आणि भरती-ओहोटीचा अभ्यास करून करण्यात आला. काही ठिकाणी खडकाळ समुद्रतळ असल्याने अपेक्षित खोलीसाठी ‘रॉक ड्रेजिंग’ करावे लागू शकते. त्यामुळे वॉटर मेट्रो आणि टर्मिनल उभारणीसह जलमार्गांचा विकास हेही प्रकल्पातील महत्त्वाचे काम ठरणार आहे.
कोचीतील वॉटर मेट्रोच्या धर्तीवर मुंबईत वॉटर मेट्रो सुरू करण्यासाठी कोटी मेट्रो रेल लिमिटेडने (केएमआरएल) तयार केलेला सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) नुकताच महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडे सादर करण्यात आला. ‘डीपीआर’नुसार मुंबईत सुमारे २५० किलोमीटरचा जलमार्ग प्रस्तावित आहे. त्यात २१ मार्ग, ४९ टर्मिनल आणि २०७ इलेक्ट्रिक व हायब्रिड बोटींचे नियोजन आहे. वैतरणा, वसई, माणोरी, ठाणे, पनवेल, करंजा, मुंबई बंदर परिसर आणि किनारी भागातील मार्गांचा त्यात समावेश आहे. याशिवाय सध्याचे जलवाहतूक मार्ग आणि टर्मिनलचे आधुनिकीकरणही नियोजित आहे. त्याअंतर्गत सुरक्षित जलवाहतुकीसाठी जलमार्गांची खोली आणि समुद्रतळाची स्थिती तपासण्यात आली. त्यानुसार आवश्यक ठिकाणी गाळ काढणे आणि खडकाळ भागात रॉक ड्रेजिंगची कामे करावी लागू शकतात.
----
तीन टप्प्यांत विस्तार
प्रकल्पाची अंमलबजावणी तीन टप्प्यांत करण्याचे नियोजन आहे. उपलब्ध प्रकल्प नियोजनानुसार पहिला टप्पा २०२९ पर्यंत, दुसरा २०३० पर्यंत आणि अंतिम टप्पा २०३६ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
---
पहिल्या टप्प्यात ११ मार्ग
वॉटर मेट्रोसाठी पहिल्या टप्प्यात ११ जलमार्ग आणि २४ स्थानके विकसित करण्याचे नियोजन आहे. हे मार्ग सध्याच्या २५ जेट्टींशी जोडले जाणार आहेत. वर्सोवा-मढ हा त्यातील महत्त्वाचा मार्ग आहे. या टप्प्यात जेट्टी आणि टर्मिनल विकासासोबत जलमार्गांची योग्य खोली राखणे आणि सुरक्षित नौकानयनासाठी आवश्यक सुविधा उभारल्या जाणार आहेत.
----
६,०६६ कोटींचा प्रकल्प
मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाची किंमत सुमारे सहा हजार ६६ कोटी असून, त्यात जलमार्ग, टर्मिनल, बोटी आणि संबंधित पायाभूत सुविधांचा समावेश आहे.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.