प्रसिद्ध ‘सुलेमान उस्मान मिठाईवाला’वर कारवाई

प्रसिद्ध ‘सुलेमान उस्मान मिठाईवाला’वर कारवाई
Published on

प्रसिद्ध ‘सुलेमान उस्मान मिठाईवाला’वर कारवाई
मुंबईतील १० आस्थापनांचे परवाने निलंबित
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईत धडक तपासणी मोहीम राबवली. १७ ते २० सप्टेंबरदरम्यान करण्यात आलेल्या तपासणीत गंभीर स्वच्छता त्रुटी, अन्न साठवणुकीतील अनियमितता आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळलेल्या मुंबईतील १० अन्न आस्थापनांचे परवाने किंवा नोंदणी प्रमाणपत्रे निलंबित करण्यात आली आहेत. त्यात दक्षिण मुंबईतील सुमारे ९० वर्षे जुने आणि प्रसिद्ध सुलेमान उस्मान मिठाईवाला, बॅलार्ड इस्टेट येथील स्विगी इन्स्टामार्ट, मालाड पूर्वेतील सद्‍गुरू स्वीट्स अँड फरसाण मार्ट, कांदिवलीतील जैन स्वीट अँड भेलपुरी हाऊस यांच्यासह विविध खाद्य आस्थापनांचा समावेश आहे.
मोहम्मद अली रोडवरील १९३६ पासून सुरू असलेल्या सुलेमान उस्मान मिठाईवाला येथे स्वच्छतेसंदर्भात गंभीर त्रुटी आढळल्या. खाद्यपदार्थ तयार करणे आणि साठवणुकीची जागा या सांडपाणी आणि कचऱ्यापासून स्वतंत्र नसल्याचे आढळले. तपासणीवेळी काही नाल्या उघड्या आढळल्या. तयार मिठाई तापमान आणि आर्द्रता नियंत्रण नसलेल्या ठिकाणी ठेवण्यात आल्याचेही आढळले. या त्रुटी ग्राहकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात, असे नमूद करीत एफडीएने परवाना निलंबित केला. बॅलार्ड इस्टेट येथील स्विगी इन्स्टामार्टच्या डार्क स्टोअरमध्ये तपासणीदरम्यान तांदळाच्या पिशव्या उंदरांनी कुरतडलेल्या आढळल्या. धान्य सांडलेले तसेच उंदरांची विष्ठाही आढळली. याशिवाय झुरळे, माश्या आणि मृत कीटक आढळून आले. मालाड पूर्वेतील सद्गुरू स्वीट्स अँड फरसाण मार्टमध्ये गंभीर अस्वच्छता, तयार मिठाईवर माश्यांचा प्रादुर्भाव आढळला. कांदिवली परिसरातील जैन स्वीट अँड भेलपुरी हाऊसवरही अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने कारवाई करण्यात आली. याशिवाय चेंबूरमधील नाइस एंटरप्रायझेस, घाटकोपर पूर्वेतील गो ग्रीन फूड हॉस्पिटॅलिटी, लालबाग येथील स्वाद स्नॅक्स कॉर्नर तसेच वर्सोवा-अंधेरी पश्चिमेतील लखनवी कबाब आणि झायका मुरादाबादी हॉटेलवरही कारवाई करण्यात आली.

राज्यभरात ३२ हजार किलो/लिटर अन्नपदार्थ जप्त
सणासुदीच्या काळात राज्यभरात एफडीएकडून करण्यात आलेल्या कारवाईत सुमारे ३२ हजार किलो/लिटर संशयित किंवा अस्वच्छ अन्नपदार्थ जप्त अथवा नष्ट करण्यात आले. या अन्नपदार्थांची अंदाजे किंमत एक कोटी ३६ लाख २० हजार ७३५ रुपये असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. प्रतिबंधित पानमसाला आणि गुटख्याच्या विक्री व साठवणुकीप्रकरणी १४ गुन्हे दाखल करण्यात आले असून, १५ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एक कोटी ३८ लाख ७४ हजार ४३ रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com