

सरकारी रक्तपेढ्यांना रक्ताची वानवा
कांदिवली शताब्दी रक्तकेंद्राचा परवाना तीन दिवस निलंबित
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : मुंबईतील महापालिका आणि सरकारी रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असताना, महापालिकेच्या सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावरील काही रक्तपेढ्यांमध्ये मात्र पुरेसा रक्तसाठा उपलब्ध असल्याचा दावा केला जात आहे. गरजेच्या वेळी सरकारी रक्तपेढ्यांना परस्पर समायोजनाच्या माध्यमातून रक्त उपलब्ध करून देण्याऐवजी त्याची विक्री केली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
पीपीपी करारानुसार, शक्य असल्यास इतर महापालिका किंवा सरकारी रक्तपेढ्यांना रक्तपुरवठा करण्याची तरतूद असल्याचे सांगितले जाते, मात्र एका बाजूला महापालिकेच्या नावाने मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरे घेऊन रक्तसाठा निर्माण करणाऱ्या पीपीपी रक्तपेढ्या, तर दुसऱ्या बाजूला रक्तासाठी धावपळ करणाऱ्या सरकारी रक्तपेढ्या, अशी विसंगत परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, कांदिवली पश्चिम येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापालिका रुग्णालयातील रक्तकेंद्राचा परवाना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) २ ते ४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीसाठी तीन दिवस निलंबित केला आहे. २ मार्च रोजी झालेल्या तपासणीत रक्तकेंद्रात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसणे, केंद्र २४ तास सुरू नसणे आणि बाह्य रक्तदान शिबिरांसाठी आवश्यक मंजूर तंत्रज्ञांची कमतरता आढळून आली. यासंदर्भात रक्तकेंद्राने दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याचे ‘एफडीए’ने नमूद केले.
तीन वर्षांत रक्तसंकलन निम्म्यावर
कांदिवलीतील या रक्तकेंद्रातील रक्तसंकलनातही मोठी घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. २०२२-२३ मध्ये एक हजार ७४६ युनिट रक्तसंकलन झाले होते. हे प्रमाण २०२५-२६ मध्ये घटून ९९२ युनिटवर आले. एप्रिल आणि मे २०२६ या दोन महिन्यांत तर प्रत्येकी केवळ २५ युनिट रक्तसंकलन झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.